जि. प. मतदारसंघात निधीचे असमान वितरण होत असल्यामुळे महिला सदस्यांनी ‘आम्ही नक्की कोण आहोत,’ ‘आम्हाला फक्त चहा-नाश्ता करण्यास सभेला बोलविले जाते का’, असा संतप्त सवाल केला. सौरदिव्यांचा घोटाळा, गाळ काढण्याच्या कामांना स्थगिती यावरून झालेल्या चर्चेत भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये हमरी-तुमरी झाल्याने जि. प. सर्वसाधारण सभा शुक्रवारी गाजली. दरम्यान, महापालिकेनंतर जि. प.तही भाजप-सेनेच्या सदस्यांमध्ये वाद झाल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
जि. प.च्या निवडक गटांमध्येच निधी वितरीत होतो. सर्वसाधारण सभेला येणाऱ्या महिला सदस्यांच्या मतदारसंघात विकास योजनांना निधीच मिळत नाही, असा आरोप करण्यात आला. औरंगाबाद पंचायत समिती सदस्या सरसा वाघ यांनी निकष न पाळता तो का वितरीत केला जातो? आम्ही काय चहा-नाश्तासाठी येतो का, असा प्रश्न विचारला. पुष्पा जाधव यांनी समस्या अधिक टोकदारपणे मांडली. त्या म्हणाल्या की, असमान निधीवाटपाची कामे रद्द करायला हवीत.
महिला सदस्यांच्या या आक्रमक पवित्र्याने सभेत गदारोळ झाला. शिवाय गाळ काढण्याचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला. पुढील निधी येत नाही तोपर्यंत ही कामे घेतली जाणार नाहीत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले. निधी आलाच नाही तर, असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, ‘गाळा’त अडकलेल्या पुढाऱ्यांना चांगलेच सुनावण्यात आले. या दरम्यान सौरदिव्याचा प्रश्नही भाजपचे ज्ञानेश्वर मोरे यांनी लावून धरला. नेहमी एकच विषय कसा चर्चेत ठेवता, असा प्रश्न शिवसेनेच्या दीपक राजपूत केल्याने वाद झाला. भाजप-सेनेच्या सदस्यांत हमरी-तुमरी झाल्याने गदारोळ झाला.