अनेकदा मागणी करूनही महावितरण कंपनीकडून चाळीस वर्षांपासून उरणच्या पूर्व विभागाला वीजपुरवठा करणाऱ्या जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या व सडलेले खांब कायम असल्याने येत्या पावसाळ्यात तारा तुटल्याने व खांब कोसळल्याने अपघात होऊन ग्रामस्थांवर आपले प्राण गमावण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने ही मृत्यूची टांगती तलवार दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने उपाययोजना करावी, अशी मागणी उरण तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.खाडीकिनाऱ्यावर वसलेल्या उरण तालुक्यातील अनेक गावांना मान्सूनच्या पावसाचा तडाखा सहन करावा लागतो. या परिसरात पावसाळ्यात येणाऱ्या वादळी व सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे अनेकदा सडलेले विजेचे खांब, जीर्ण झालेल्या तारा तुटून अनेकदा अपघात घडलेले आहेत. यामध्ये काहींना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिलेली आहेत. त्याचप्रमाणे आंदोलनाचे इशारेही दिलेले आहेत. असे असले तरी महावितरणकडून अनेक कारणे पुढे करून या समस्या सोडविण्यात असमर्थता दाखविली जात असल्याने येत्या पावसाळ्यात खास करून उरण पूर्व विभागातील खोपटा परिसरातील विजेचे खांब व तारा तुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने ही मृत्यूची टांगती तलवार दूर करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे.