देशी आणि विशेषत: विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेली आणि काही काळ बंद असलेली ‘डेक्कन ओडिसी’ ही राजेशाही गाडी येत्या ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहे. यावेळी ती राज्याच्या सीमा ओलांडून देशभरात जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन  विकास महामंडळाने (एमटीडीसी) ही गाडी चालवण्याकरता कॉक्स अँड किंग्ज लि. (सीकेएल) या पर्यटन कंपनीची ‘आऊटसोस्र्ड पार्टनर’ म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांचे दर्शन घडवणाऱ्या ‘डेक्कन ओडिसी’ ला खासकरून विदेशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर पर्यटकांचा ओघ कमी होऊ लागला आणि लवकरच ही गाडी बंद पडली. आता परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर एमटीडीसीने ही आलिशान गाडी पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर चालवण्याकरता कॉक्स अँड किंग्ज कंपनीशी ‘प्रॉफिट शेअरिंग’ तत्त्वावर भागीदारी केली आहे. सर्व ‘ऑन-बोर्ड’ व ‘ऑफ-बोर्ड’ सेवा, विक्री, मार्केटिंग आणि या उपक्रमाचे व्यवस्थापन समाविष्ट असलेला हा भागीदारीचा करार ५ वर्षे मुदतीचा असून त्याला आणखी ५ वर्षे मुदतवाढ मिळू शकेल, असे कलमही करारात आहे, अशी माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील आणि सीकेएलचे संचालक (विशेष प्रकल्प) अरुप सेन यांनी पत्रकारांना दिली.
यापूर्वी महाराष्ट्रातील स्थळांचे दर्शन घडवणारी ‘डेक्कन ओडिसी’ आता देशात वेगवेगळ्या १० मार्गावर धावणार, हे नव्या बदलाचे वैशिष्टय़ आहे. ‘महाराष्ट्र स्प्लेंडर’ ही टूर मुंबई-औरंगाबाद/वेरूळ, ताडोबा, अजिंठा लेणी, नाशिक, कोल्हापूर, गोवा व परत मुंबई अशी असेल. ‘महाराष्ट्र वाईल्ड ट्रेल’ ही टूर मुंबई- अजिंठा लेणी, नागपूर- पेंच, ताडोबा, औरंगाबाद-वेरूळ लेणी, मुंबई मार्गावर धावेल. ‘स्पिरिच्युअल सह्य़ाद्री’ ही मुंबई- नाशिक, शिर्डी, मुंबई अशी राहील. तर ‘सोल क्वेस्ट’ ही टूर मुंबई- शिर्डी- मुंबई अशी धावेल. या सर्व सहली महाराष्ट्रातील असतील.
याशिवाय, ‘हिडन ट्रेझर्स ऑफ गुजरात’ ही ८ दिवस/७ रात्रींची सहल मुंबई- वडोदरा, पलिताना, सासण, गीर, कच्छचे छोटे रण, पाटण, अहमदाबाद, दिल्ली अशा मार्गावर धावणार आहे. दक्षिण भारतातील ‘ज्युवेल्स ऑफ द डेक्कन’ हीदेखील ८ दिवस/७ रात्रींची टूर असून ती मुंबई- विजापूर, ऐहोळे, पट्टदकल, बदामी, हंपी, हैदराबाद व परत मुंबई अशी असेल. पश्चिम व उत्तर भारताचेही दर्शन या गाडीमुळे घडणार आहे. त्यापैकी ‘इंडियन सॉयरी’ ही ८ दिवस/७ रात्रींची टूर मुंबई- अजिंठा लेणी, सांची, सवाई माधोपूर/ रणथंबोर, जयपूर, आग्रा, नवी दिल्ली अशी धावेल. ‘इंडियन ओडिसी’ ही ८ दिवस/७ रात्रींची टूर नवी दिल्ली- सवाई माधोपूर/रणथंबोर, आग्रा, जयपूर, जोधपूर, उदयपूर, वडोदरा, मुंबई या मार्गावर धावेल. ‘गोल्डन ट्रेझर्स’ ही ४ दिवस/३ रात्रींची टूर असून ती नवी दिल्ली, आग्रा, सवाई माधोपूर/ रणथंबोर, जयपूर, नवी दिल्ली अशी धावेल. ‘इंडियन सोजर्न’ ही ८ दिवस/७ रात्रींची टूर असून ती नवी दिल्ली- सवाई माधोपूर/रणथंबोर, जयपूर, आग्रा, सांची, अजिंठा लेणी, औरंगाबाद/वेरूळ लेणी, मुंबई या मार्गावर फिरेल.
‘डेक्कन ओडिसी’च्या पर्यटक प्रवाशांना महाराष्ट्रीय पदार्थाची चव चाखायला मिळावी याकडे विशेष लक्ष पुरवले जाणार असून, त्याशिवाय काँटिनेंटल फूडही उपलब्ध असेल, असे एमटीडीसीच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी सांगितले. एमटीडीसीचे सह- महासंचालक सतीश सोनी हेही यावेळी हजर होते.