नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या वेळी शहरात टोल आकारणी रद्द व्हावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय येथे सोमवारी रात्री झालेल्या टोलविरोधी कृतीसमितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. तोपर्यंत संपूर्ण जिल्हाभर टोलविरोधात जनजागृती करण्याचा निर्णयही चार तासाहून अधिक काळ सुरू राहिलेल्या या मेळाव्यात घेण्यात आला.    
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर आयआरबी कंपनीच्या वतीने १७ ऑक्टोबरपासून टोल आकारणी सुरू केली आहे. ही टोलआकारणी रद्द व्हावी यासाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे. दिवाळीमुळे आंदोलनाने काही काळ उसंत घेतली होती. आता पुन्हा एकदा टोलविरोधातील एल्गार छेडण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. आंदोलनाची दिशा ठरविणे व त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी सोमवारी केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात वरीलप्रमाणे आंदोलनाची भूमिका ठरविण्यात आली.     
दुपारी चार वाजता सुरू झालेला मेळावा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहिला. श्रीमंत शाहू महाराज, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, गोविंदराव पानसरे, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील, रामभाऊ चव्हाण, भगवान काटे आदींची भाषणे झाली.