महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आयटक संलग्न महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले.
या संघटनेच्या वतीने नागपूर येथे मनरेगा आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष नाशिक येथील राजू देसले यांसह सरचिटणीस राजन क्षीरसागर, राज्य संघटक सचिन पाटील, ओंकार जाधव, सनी धात्रक, विनायक कटारे आदिंनी केले. डॉ. राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. आपल्या अधिकाधिक मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. १५ दिवसांच्या आत मंत्रालयात संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल असेही ते म्हणाले. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, राजस्थानप्रमाणे वेतन व कायम करावा, सद्या बाह्य़स्थ पद्धतीने कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना योजनेतील कार्याच्या अनुभवावर त्यांची कुठलीही परीक्षा न घेता योजनेच्या राज्य निधी असोसिएशनमध्ये सामील करण्यात यावे अथवा शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पदाच्या दर्जानुसार वेतन देण्यात यावे, पूर्वीपासून आजपर्यंत योजनेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करून कायमस्वरुपी करण्यात यावे आदी मागण्या संघटनेने मांडल्या आहेत.