विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी आमदार वसंत गिते यांनी मनसेला रामराम ठोकत अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर भाजपमधीलच काही जण नाराज झाले असले तरी मनसेतील गिते विरोधक गट मात्र सुखावला. गितेंच्या वर्चस्वामुळे महापालिकेतील सत्तेच्या तसेच पक्षातील महत्वपूर्ण पदांपासून वंचित राहिलेल्यांना आता तरी न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या यापूर्वीच्या दौऱ्यांमध्ये तसे संकेत दिले असले तरी कोणतीही घोषणा करणे मात्र टाळले होते. राज आता पुन्हा पुढील आठवडय़ात नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने यावेळी तरी शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदांविषयी काही घोषणा होईल काय, याबद्दल मनसेमध्ये उत्सुकता आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत असताना वसंत गिते यांनी शहरासह जिल्ह्यातील संपूर्ण मनसे आपल्या ताब्यात राहील असा प्रयत्न केल्याचा विरोधी गटाकडून आरोप केला जात होता. महापौर पदाच्या निवडीपासून सुरू झालेल्या या राजकारणाने नंतरच्या काळात अधिक तीव्र स्वरूप धारण केले होते. विशेषत्वाने सध्याचे सभागृह नेते शशिकांत जाधव यांच्यावर वारंवार अन्याय झाल्याची ओरड सुरू होती. मनसेच्या पहिल्या महापौरपदासाटी जाधव आणि हेमंत गोडसे हेच सर्वार्थाने योग्य असल्याचे म्हटले जात असताना अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या बाजूने कौल देण्यात आला. त्यानंतरही अन्यायाची मालिका सुरूच राहिली. दुसरीकडे नितीन भोसले आणि वसंत गिते यांच्यात कधी सख्य असे झालेच नाही. गितेंमुळे पक्षात प्रगती होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर राजकीय महत्वाकांक्षेने पछाडलेल्या गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करून खासदारकीही मिळवली. प्रारंभी गितेंच्या बाजूने असणारे अ‍ॅड. उत्तमराव ढिकले हेही नंतर त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊ लागले. जाधव हेही पक्षातून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरू झाली.
या पाश्र्वभूमीवर पक्षाने मुंबईहून थेट निरीक्षक नाशिकमध्ये पाठविले. स्थानिक घडामोडींमध्ये ते अधिक बारकाईने लक्ष देऊ लागल्याने गिते यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे गिते हे राज यांच्यापासून दूर जाऊ लागल्याचे दिसून येऊ लागले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ही दुरी अधिकच वाढली. नाशिकमधील मनसेच्या दारूण पराभवानंतर राज यांनी नगरसेवकांसह पक्षातील इतरांशी थेट व्यक्तीगत चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. या वेळी गिते यांच्या कार्यशैलीबद्दल अनेकांनी मत मांडल्याचे सांगण्यात आले. तरीही राज यांनी गिते यांच्याविरोधात थेट कोणतेही पाऊल उचलण्याचे टाळले. परंतु गिते यांनी पराभवानंतर पदाचा राजीनामा दिला. राज हेही कदाचित त्याचीच वाट पाहात असावेत. त्यांनी गिते यांच्यासह ज्यांनी राजीनामे दिले आहेत ते स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करत एका वेगळ्या राजकारणास सुरूवात केली.
पक्षातून गिते दूर झाल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबद्दल तर्क लढविले जात असताना राज यांनी मागील दौऱ्यांमध्ये त्याविषयी कोणतीही घोषणा करणे टाळले. दरम्यानच्या काळात जाधव आणि भोसले हे राज यांच्या अधिक संपर्कात आल्याने त्यांच्यावर नव्याने जबाबदारी टाकण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.
गिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर जिल्ह्याचा दौरा करून मेळावा घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर राज यांच्या आगामी दौऱ्यात तरी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा होईल काय, याबद्दल मनसेमध्ये उत्सुकता आहे.