तीस वर्षांत शेतजमिनींचा वापर औद्योगिकीकरण, उद्योग निर्मिती तसेच घर बांधणीसाठी होऊ लागल्याने उरण तालुक्यातील भातशेतीत घट होऊ लागली आहे. गेल्या वर्षी तालुक्यातील पूर्व विभागात शिल्लक असलेल्या भातशेतीपैकी २६०० हेक्टर जमिनीवर पीक घेण्यात आले होते. यावर्षी त्यात घट होऊन २४६० हेक्टर जमिनीवरच पीक घेतले गेल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.
रायगड जिल्हा हा भातशेतीसाठी व मिठागरांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्य़ातील उरणला भाताचे कोठार संबोधले जात होते. मात्र हे भाताचे कोठार आता रिते होऊ लागले आहे. ४३ वर्षांपूर्वी शासनाने सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यातील पश्चिम विभागातील बहुतांशी जमीन संपादित केली आहे. त्यामुळे पश्चिम विभागात सध्या शेतीच शिल्लक नाही. तर पूर्व विभागात शिल्लक असलेल्या शेतीवर जेएनपीटी बंदराच्या उभारणीनंतर गोदामे तसेच बंदरावर आधारित तत्सम उद्योगांची उभारणी होत असल्याने शेतजमिनी कमी होत आहेत. सिडकोने या परिसरात नव्याने नयना प्रकल्प जाहीर केला त्यामुळे त्यासाठी आणखी जमीन संपादित केली जाणार आहे. पूर्वी १४ हजार असलेली खातेदारांची संख्या आता १२ हजार ७०४ वर आली आहे. सततची नापिकी, बेभरोसे उत्पादन यामुळेही अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
घटत्या भातशेतीवर
विविध योजनांचा मारा
भातशेती घटत असली तरी शासनाच्या माध्यमातून उरणमधील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असल्याची माहिती उरणचे तालुका कृषी अधिकारी के.एस.वसावे यांनी दिली आहे. पावसाळा जवळ आल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून खत, बियाणे व औषधे असे तीन हजार रुपयांचे आत्मा या कृषी योजनेचे पॅकेज दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी भाताशिवाय भाजीपाल्याचेही उत्पन्न घेऊन जोडव्यवसाय करावा याकरिता कृषी मित्र नेमून त्यांच्यामार्फत शेतीविषयक तंत्रज्ञानाचीही सोय केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.