निवडणूक प्रचाराची धावपळ, मतदानाचा व्यस्त दिवस आणि मतमोजणीची उत्सुकता या साऱ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त झालेले राजकीय नेते, कार्यकर्ते आणि मंडळांचे संपूर्ण लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडेच लागून राहिल्याने यंदा दिवाळीतील राजकीय पक्षांच्या आकाश कंदिलांना असणारी मागणी कमालीची घटली आहे. दिवाळी आधी महिनाभर कंदिलांची मागणी करणारे राजकीय मंडळी दिवाळसण  एका आठवडय़ावर येऊन ठेपला असतानाही आकाश कंदील उभारणीसाठी फारसे उत्सुक नसल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. कंदिलाच्या माध्यमातून जाहिरातबाजी केली जाते. मात्र मतदानाची धामधूम आताच संपल्याने जाहिरात करायची कुणासाठी याच विचाराने राजकीय कंदीलबाजी घटल्याचे काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच सांगितले.
मुंबई, ठाण्यासह ग्रामीण भागांमध्ये जनतेला दिवाळीचे वेध लागले असून दिवाळीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजू लागल्या आहे. रस्ते, पदपथ, दुकाने, मॉलमध्ये दिवाळीच्या वस्तूंची विक्री होऊ लागली आहे. दिवाळीसाठी खास ग्राहकपेठांचे आयोजन होऊ लागले असून खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली आहे. राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले पुढारी, कार्यकर्ते आणि मंडळे या धामधुमीपर्यंत सध्या तरी दूर दिसू लागले आहेत. दिवाळसण जवळ आला तरी निवडणुकीचा माहोल सरला नसल्याने त्यांच्यामध्ये कंदीजबाजीला अजूनही सुरुवात झालेली नाही. राजकीय पक्ष आणि मंडळे राजकीय रंगाचे, चिन्हांचे आकाशकंदील कारागिरांकडून बनवून घेतात. हे कंदील  मोठय़ा आकाराचे असून लोखंडी सळ्यांची वेल्डिंग करून किंवा बांबूच्या काठय़ांपासून ते बनवून घेतले जातात. आपल्या पक्षाच्या झेंडय़ाच्या रंगाचे कापड लावून हे आकाशकंदील सजवले जातात. प्रत्येक वर्षी राजकीय पक्षाकडून न चुकता अशा कंदिलांची मागणी नोंदवली जाते. कारागिरांना कंदिलाचा जुना सांगाडा देऊन पुन्हा तो सजवून घेतला जातो. यंदा मात्र राजकीय मंडळींनी कंदीलबाजाराकडे पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
ठाणे शहरातील घंटाळी परिसरामध्ये राजकीय पक्ष, सार्वजनिक मंडळांसाठी घंटाळी परिसरामध्ये अशी आकाशकंदीले बनवली जात असून यंदा मात्र त्यांनी निवडणुकीमुळे काम कमी येत असल्याचे सांगितले आहे. राजकीय पक्ष प्रचारामध्ये गुंतले असून कार्यकर्ते देखील निकालाच्या प्रतीक्षेत असल्याने ही मंडळी यंदा कंदीलबाजाराकडे येऊ शकले नसले तरी आमची ठरलेली मंडळे मात्र कंदील घेण्यासाठी दिवाळीपूर्वी येतील, असा विश्वास गोविंद फडतरे यांनी व्यक्त केला आहे. फडतरे यांच्याकडे नवा कंदील बनविण्यासाठी सहा हजार तर जुन्या सांगाडय़ावर सजावटीसाठी  तीन हजार रुपये आकारले जात आहेत. २०१२ मध्ये महापालिका निवडणूक काळात अशीच मागणी घटली होती, तर मागील वर्षी मागणी वाढली होती. यंदा मात्र विधानसभा निवडणूक निकाल लागताच विजयी उमेदवार आपल्या पक्षांचे कंदील आवर्जून बनवून घेतील, असे फडतरे यांचे म्हणणे आहे.
राजकीय पक्षांमध्ये मात्र निरुत्साह..
दरवर्षी दिवाळीत आकाशकंदील लावले जात असले तरी यंदा निवडणूक निकालावर कंदील लावायचे की नाही हे ठरविणार आहोत, असे काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, सार्वजनिक मंडळांनी कंदील खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक काळात पक्षाचा झेंडा लोकांच्या मनात ठसविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता नव्याने कंदील करण्याकडे कार्यकर्ते निरुत्साही दिसत आहेत.