स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडविण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी बघतात. परंतु बिकट परिस्थितीमुळे त्या संधीपासून वंचित राहतात. तशी इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जळगावच्या दीपस्तंभने स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियानास सुरुवात केली असून, खान्देशातील तिन्ही जिल्ह्य़ांत ९ डिसेंबर रोजी स्थानिक महाविद्यालयात ही परीक्षा होत आहे.
याबाबतची माहिती दीपस्तंभ फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा. राजुवेंद्र महाजन यांनी दिली. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची एकूण २०० प्रश्नांची असणार आहे. स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास या पुस्तकावर आधारित १७५ प्रश्न परीक्षेत असतील, तर २५ प्रश्न ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांतील वृत्तपत्रातील बातम्यांवर आधारित असणार आहेत. यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राचे नियमित वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास हे पुस्तक इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, विज्ञान, सामान्य ज्ञान व सामान्य अध्यापन यावर आधारित विषयांवर तयार करण्यात आले आहे. या विषयातील भीती दूर होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात या उद्देशातून मनोरंजन आणि संवादात्मक शैलीतून त्याची मांडणी करण्यात आली आहे. राजेश पाटील, संदीप साळुंखे, भरत आंधळे या आयएएस व आयआरएसचे प्रेरणादाई संदेश व २२ तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लेख असे उपयुक्त पुस्तक दीपस्तंभचे महाअभियान व्यवस्थापन प्रमुख राजेंद्र पाटील व प्रमोद पाटील यांच्याकडे उपलब्ध आहे.
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील २०० महाविद्यालयांत ही २० हजार पुस्तके आहेत. स्पर्धा परीक्षा अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रा. महाजन यांनी सांगितले आहे.