येवला तालुक्यातील हजारो काळवीट व हरणांना वाहनांची धडक बसल्याने घडणारे अपघात, कठडे नसलेल्या विहिरीत पडून होणाऱ्या दुर्घटना आणि कच्छपी लागलेले शिकारी यांचे गडद सावट दाटले असताना त्यांना सुरक्षितता देऊ शकणाऱ्या संरक्षित वनक्षेत्राच्या प्रस्तावाकडे शासनाने डोळेझाक करण्याची भूमिका स्वीकारली आहे. महत्वाची बाब म्हणजे, राज्य वन्यजीव मंडळाने या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देऊनही शासकीय पातळीवरून त्यास हिरवा कंदील दाखविला जात नसल्याने काळवीट व हरणांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसत आहे.
काळी माती, गवताळ उंच-सखल प्रदेशामुळे तालुक्यातील राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश, रेन्डाळे, वाघाळे गावात हरणांचे कळपच्या कळप दृष्टिपथास पडतात. त्यात काळविटांची संख्या सर्वाधिक म्हणजे सात ते आठ हजारापर्यंत पोहोचली आहे. हजारोंच्या संख्येने असणाऱ्या नाजुक प्राण्याच्या जिवावर विविध कारणांनी संक्रांत आल्याचे दिसते. उन्हाळ्यात परिसरात पाण्याची तीव्र टंचाई भेडसावते. यामुळे चारा व पाण्यासाठी हे कळप मानवी वस्तीकडे धाव घेतात. यावेळी त्यांना प्रथम कुत्र्यांशी सामना करावा लागतो. शेत वस्तीवरील कुत्रे हरणांच्या मागे लागतात. यामुळे सैरभैर झालेले हरीण जिकडे मोकळी जागा दिसेल, तिकडे धूम ठोकते. या गोंधळात कठडा नसलेल्या विहिरीत पडून अनेक हरीण मृत झाल्याच्या घटना आजवर घडलेल्या आहेत. कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले काही हरीण त्यांचे भक्ष्य बनतात. मध्यंतरी वन विभागाने कुत्र्याच्या मालकांवर
कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु, ग्रामपंचायतीत कुत्र्यांची नोंदच नसल्याने वन विभाग इशाऱ्यापलीकडे काही करू शकलेला नाही. रस्ता ओलांडताना अपघातात जीव गमाविणाऱ्या हरणांची संख्याही मोठी आहे. वन विभागाच्या माहितीनुसार २०१३-१४ या वर्षभरात वाहनांची धडक बसून २९ हरणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात हा आकडा किती तरी पटींनी अधिक असल्याचे वन्यप्राणी मित्र प्रवीण आहेर यांचे म्हणणे आहे.
हरणांची नित्यनेमाने होणारी शिकार हादेखील गंभीर विषय. स्थानिक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कधीकधी गोळी झाडल्याचे आवाज कानी पडतात. अंधारात टोळकी बॅटरीच्या प्रकाशझोतात हरणांचा शोध घेताना दिसतात. परंतु कायद्याच्या चौकटीत गुरफटणे नको, या मानसिकतेमुळे शेतकरी मौन बाळगणे पसंत करतात. जुलै २००९ मध्ये खरवंडी दरवंडी परिसरात हरणांची शिकार करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलीस व वन विभागाने रंगेहाथ पकडले होते. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर पुन्हा काही दिवसांत शिकाऱ्यांनी ४५ हरीण एका वाहनात टाकून पळविले होते. दरवर्षी जुलै महिन्यात शिकारीच्या सर्वाधिक घटना घडतात. या तिहेरी संकटात हजारो हरीण भरडले जात आहेत.
हरणांच्या सुरक्षिततेसाठी येवला वन विभागाच्या अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या ११ हजार हेक्टर वनक्षेत्रातील काही क्षेत्र वनक्षेत्र संरक्षित होणे अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन २०११ मध्ये वन विभागाने त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. लालफितीच्या कारभारातून या प्रस्तावाला काही महिन्यांपूर्वी राज्याच्या वन्यजीव मंडळाने तत्त्वत: मान्यता दिली, परंतु राज्य शासनाकडून अंतिम शिक्कामोर्तब न झाल्यामुळे तो अद्याप वास्तवात येऊ शकलेला नाही. उपरोक्त क्षेत्र वनक्षेत्र संवर्धन म्हणून राखीव झाल्यास हरणांना नाहक जीव गमवावा लागणार नाही. परंतु त्याकडे
दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागल्याचे लक्षात येते.
इतर वन्यप्राण्यांचे अस्तित्व
येवला तालुक्यातील वन क्षेत्रात हरीण व काळविटांसोबत तरस, घुबड, लांडगा, खोकड, कोल्हा, सायाळ यासारखे वन्यप्राणी मोठय़ा प्रमाणात आहेत. वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक दुर्मीळ पक्षीही आढळून आले. कापसी घार, भारद्वाज, मोर, खाटीक, चांडोल, खंडय़ा आदी पक्षी आहेत. यासोबत शिवन, चिंच, करंज, आवळा, हिरडा, बेहडा, अंजन, अपटा, अर्जुनसाल, निरगुडी, वड, सीताफळ, जांभूळ आदी झाडांचा समावेश आहे.
वनक्षेत्र संवर्धन म्हणून राखीव झाल्यास होणारे लाभ
*  हरीण व काळविटांची संरक्षक कुंपणात जोपासना
*  खाद्य आणि कुरणांची लागवड
*  पाणवठय़ांचा विकास करून पाण्याची व्यवस्था
*  वैद्यकीय सुविधा आणि पशुवैद्यकीय अधिकारी
* प्राण्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते मनुष्यबळ
*  पर्यटन विकासाच्या दृष्टीने सोयी सुविधा