सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर राजकीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी होऊ लागल्याची बाब पुढे आली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सुनील बागूल यांची ‘फेसबुक’वरून अतिशय अर्वाच्च शब्दात हेटाळणी करण्यात आल्याची तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजकीय पक्षातील बहुतेक पदाधिकाऱ्यांनी आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी ‘फेसबुक’ व ‘ट्विटर’सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा आधार घेतला आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग होत असला तरी काही वितुष्ट घटक त्यामार्फत राजकीय नेत्यांना लक्ष्य करत असल्याचे दिसते. भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा हे त्याचे उदाहरण. या प्रकरणी भगवंत पाठक यांनी तक्रार दिली. दोन ते पाच सप्टेंबर या कालावधीत जितेंद्रसिंग बिंद्रा या नावाच्या फेसबुक खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील बागूल यांच्याबद्दल अवमानास्पद मजकूर लिहिला गेला. त्यासाठी शिवराळ भाषेचा वापर केला गेला. ही बाब बागूल समर्थकांच्या निदर्शनास आल्यावर तक्रार देण्यात आली. कोणत्याही विषयावरून राजकीय पक्षांमधील वाक् युद्ध नवीन नाही. या युद्धात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविली जात असली तरी त्यात शब्दांचा वापर करताना सामाजिक सभ्यतेचा निकष कसोशीने पाळला जातो. परंतु, फेसबुकसारख्या साइट्सवरून या सभ्यता पायदळी तुडविल्या जात असल्याचे दिसत आहे.