विदर्भातील जनतेला खरोखरच विदर्भ हवा असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत विदर्भविरोधी काँग्रेस आणि शिवसेनेचे पानिपत करा, असे आवाहन करून फॉरवर्ड ब्लॉक आणि शिवराज्य पक्षातर्फे महाराष्ट्रातील संपूर्ण जागेवर उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती फारवर्ड ब्लॉकचे उपाध्यक्ष माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी दिली.  
फॉरवर्ड ब्लॉक आणि शिवराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, येत्या निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ हा मुद्दा राहीलच. विदर्भाची स्थिती तेलंगणासारखी करू नका. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असा सूचक इशाराही धोटे यांनी यावेळी दिला. शिवराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, समता, बंधुत्व, न्याय या तत्त्वावर शिवराज्य पक्ष काम करीत आहेत. खासगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. भांडवलशाही व्यवस्था ही भ्रष्टाचाराला मूळ कारणीभूत आहे. त्यामुळे ही व्यवस्थाच उलथवून टाकणे हे पक्षाचे ध्येय आहे.
आम आदमी पक्ष आमच्या सैद्धांतिक लढय़ात सहभागी होईल, असे आम्हाला सुरुवातीला वाटले. परंतु खासगीकरणाचे समर्थन केल्याने या पक्षाशी युती होऊ शकत नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार नष्ट व्हावा, शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, असा पर्याय महाराष्ट्रात उभा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. फॉरवर्ड ब्लॉक आणि शिवराज्य पक्षच हा पर्याय देऊ शकतो. या दोन्ही पक्षाच्या कार्यकारी मंडळाची बैठक २२ फेब्रुवारीला मुंबई येथे होऊ घातली आहे. या बैठकीत पुढील निवडणुकीविषयी चर्चा करण्यात येणार असून महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, असेही सावंत यांनी सांगितले. आम्हाला अभिप्रेत असलेले उमेदवार मिळत नसल्याची खंत जांबुवंतराव धोटे यांनी यावेळी व्यक्त केली. निवडणुकीसाठी पैसा हवा आहे. तो आमच्याकडे नाही. कार्यकर्ते म्हणतात म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे धोटे आणि सावंत यांनी सांगितले. यावेळी शेख सुलतान, डॉ. नयना धवड, सुनील चोखारे, अरुण वनकर उपस्थित होते.