डोळ्याच्या विकार होऊ नयेत यासाठी लहान मुलांना देण्यात येणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतील सुमारे ७२००० बालके त्यापासून वंचित राहिली आहेत.  
बाळ नऊ महिन्यांचे झाल्यानंतर त्याला गोवराबरोबरच ‘अ’ जीवनसत्त्वाचाही डोस दिला जातो. मूल पाच वर्षांचे होईपर्यंत दर सहा महिन्याच्या अंतराने ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस दिला जातो.  गोरगरीबांच्या मुलांसाठी पालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली असून पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सरासरी तीन हजार मुलांना हा डोस दिला जातो. मात्र गेल्या तीन महिन्यापासून या डोसचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य केंद्रात हा डोस उपलब्ध नाही. परिणामी पालिकेच्या २४ वॉर्डामधील तब्बल ७२ हजार बालके ‘अ’ जीवनसत्त्वापासून वंचित राहिली आहेत. या बालकांचे पालक पालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये खेटे घालत आहेत. परंतु आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही या डोसचा पुरवठा कधी होणार याची कल्पना नाही. त्यामुळे व्यथित होईन पालकांना घरची वाट धरावी लागत आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये दर मगळवारी आणि शनिवारी लसीकरण मोहीम राबविण्यात येते. तसेच विभागात दर महिन्याला सात ते आठ आरोग्य शिबिरांचे आयोजनही केले जाते. त्यावेळी नऊ महिने ते पाच वर्षांच्या बालकांना ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस देणे क्रमप्राप्त होते. एखाद्या मुलाचा ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस चुकल्यास दरवर्षी नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम राबवून त्याला तो दिला जातो. मात्र नोव्हेंबर महिना संपला तरी पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे हजारो बालके त्यापासून वंचित राहिली आहेत. ‘अ’ जीवनसत्त्वामुळे बालकांना डोळ्याचे विकार होत नाहीत. तसेच दृष्टी चांगली राहावी आणि रातआंधळेपणा येऊ नये यासाठी ‘अ’ जीवनसत्त्वाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सरकार आणि पालिकेच्या अनास्थेमुळे हजारो मुले ‘अ’ जीवनसत्त्वापासून वंचित राहिली आहेत.