आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणल्या असताना विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी ‘रास्ता रोको’ करून संताप व्यक्त केला. त्यामुळे वेळेवरच आर्णी पोलिसांना हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची समजूत काढावी लागली. ठाणेदार गिरीश बोबडे यांनी शिष्टाई करून शेतकऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली.
शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या यवतमाळ-आर्णी रोडवरील यार्डमधील खरेदी केंद्रावर सुमारे ७ दिवसांपासून भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणून ठेवल्या. मात्र, व्यापाऱ्यांकडून लिलावाची प्रक्रियाच सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला.
ज्या दिवशी ‘रास्ता रोको’ करण्यात आला त्या दिवशी खरेदीला प्रारंभ झाला. मात्र, आज बुधवारी पुन्हा खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याला त्वरित खरेदी करून न्याय देण्याची भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीने घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, व्यापाऱ्यांच्या साखळीमुळे शेतकरी राजाची मोठी कोंडी होताना दिसत असून बाजार समितीकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने सुद्धा खरेदीच्या दृष्टीने विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात आपला शेतमाल विक्रीसाठी आणला त्याचवेळेस मालाचे भाव पाडले जातात, ही बाब नेहमीचीच आहे. आर्णीची बाजारपेठ मोठी असल्याने या बाजार समिती अंतर्गत मोठय़ा प्रमाणात शेतकरी आपला माल दूरून विक्रीस आणतात.
कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेत खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत.