मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतींच्या दुरुस्तीला उशिरा सुरुवात करण्यात आल्याने मुलांना नादुरुस्त वर्गखोल्यांमध्येच शिक्षण घेण्याची पाळी आली आहे. येत्या २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. पण, अनेक शाळांच्या इमारतींची दुरुस्तीच झालेली नाही. दुसरीकडे, मेळघाटातील शिक्षकांच्या निवासस्थानांचाही प्रश्न प्रलंबित आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला खरा, पण ही कामे उशिरा सुरू करण्यात आल्याने शाळा सुरू होईपर्यंत ती पूर्ण होऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. अमरावती जिल्ह्य़ात जिल्हा परिषदेच्या १३२८ शाळा आहेत. त्यापैकी ९७५ शाळांना संरक्षक भिंती नाहीत, ६५८ शाळांमध्ये विद्युत व्यवस्था नाही. स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या सुविधेविषयी सातत्याने ओरड आहे. मेळघाटात तर स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. काही शाळांच्या वर्गखोल्या छपराविना आहेत. या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी मोठा खर्च केला जातो. पण, त्यातून साध्य पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातच यंदा कामांना उशिरा सुरुवात झाल्याने शिक्षकही चिंतेत आहेत. अनेक वर्गखोल्यांचे टीन उडून गेले आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असताना पावसाळ्याच्या प्रारंभी या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच पावसाने कामांमध्ये अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे.
मेळघाटातील शिक्षणाच्या दर्जाविषयी असमाधान व्यक्त केले जात असताना पायाभूत सुविधांकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष आहे. विनाछपरांच्या किंवा गळणाऱ्या वर्गखोल्यांमध्ये वर्ग भरवणे कठीण होऊन बसते. पावसाळ्यात शाळा बंद ठेवावी लागते. अनेक स्वयंसेवी संस्थांनी, तसेच गावकऱ्यांनी तक्रारी करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. मेळघाटातील अनेक शाळांमध्ये अजूनही किचन शेड नसल्याने उघडय़ावर किंवा पडवीत अन्न शिजवले जाते. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने जलजन्य रोगांचे संकट घोंगावत असते. त्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष आहे. मेळघाटात शिक्षकांची १ हजार ६१३ पदे मंजूर आहेत. पण, केवळ ५५० निवासस्थानेच उपलब्ध आहेत. मेळघाटातील शिक्षकांनी गावातच रहावे, मुख्यालय सोडून जाऊ नये, असे निर्देश आहेत. पण, सुविधा नसल्याने शिक्षकांना तालुक्यांच्या ठिकाणाहून ये-जा करण्यावाचून पर्याय नाही. त्यातच वाहतुकीची साधने कमी असल्याने शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. शिक्षकांच्या निवासस्थानांच्या उभारणीचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला असला, तरी अंमलबजावणी संथ असल्याने १ हजारावर निवासस्थाने केव्हा उभारली जातील, हे प्रश्नचिन्ह कायम आहे. निवासस्थानांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीत निधीची मागणी करण्यात आली होती. पण, पुरेशा निधीअभावी ही कामे रखडली आहेत. धारणी तालुक्यात ७०६, तर चिखलदरा तालुक्यात ३८६ निवासस्थाने उभारावी लागणार आहेत.