कल्याण शहरातील वाहतूक कोंडीला यू टर्न देणारा, शहराबाहेरून जाणारा महत्त्वाचा गोविंदवाडी वळण रस्ता रखडून आता तब्बल चौदा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा रस्ता पूर्ण व्हावा म्हणून या कालावधीत अनेक आंदोलने, तुरुंग वाऱ्या आणि नारळ वाढवून झाले. तरीही पालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता, सर्वच महापौर, नगरसेवकांची उदासीनता या रस्त्याच्या रखडण्याला कारणीभूत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
दोन वर्षांपासून महापालिकेचे शहर अभियंता पाटीलबुवा कारभारी उगले हे हा रस्ता आता पूर्ण होईल, वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगत होते. मात्र त्यांचा खोटेपणा अखेर गेल्या आठवडय़ात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड झाला. सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर गोविंदवाडी रस्त्याचा विषय होता. या विषयाची इत्थंभूत माहिती शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी प्रशासनाकडून मागितली होती.
गोविंदवाडी रस्त्याचा चर्चेच्या वेळी शहर अभियंता पाटीलबुवा उगले यांनी ‘हा विषय शहर अभियंता विभागाशी निगडित नाही, नगररचना विभागाशी संबंधित आहे. भूसंपादनाच्या कचाटय़ात हा विषय अडकला आहे. या विषयाची माहिती नगरसेवकांना पाहिजे असेल तर त्यांनी तसा ठराव करून द्यावा. म्हणजे पुढील सभेत गोविंदवाडी रस्त्याची माहिती देणे सोयीस्कर होईल,’ असे उत्तर दिले. उगले यांच्या या वक्तव्याने सभागृह आवाक झाले. मात्र नवनियुक्त आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या पहिल्याच महासभेत ‘चंपी’ नको म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नरमाईची भूमिका घेऊन हा विषय सामोपचाराने हाताळला. त्यामुळे उगले चंपीपासून बचावले.
नगररचनाकार रघुवीर शेळके यांनी सांगितले, ‘गोविंदवाडी रस्त्याच्या मार्गात एक गोठा आहे. हे प्रकरण जमीन मालकाने न्यायालयात नेले आहे. जमीन मालकाने पालिकेला रस्त्यासाठी जमीन ताब्यात द्यावी म्हणून पालिकेने चौदाशे मीटरची जागा मालकाला वाडेघर येथे देण्याचे कबूल केले होते. त्यास टीडीआर किंवा बाजारभावाने किंमत देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जमीन मालकाने हे सर्व प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. विहित कायदेशीर मार्ग अवलंबल्याशिवाय या गोठय़ावर कारवाई करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत, असे शेळके यांनी सभागृहात स्पष्ट करताच सभागृह आश्चर्यचकित झाले.
राष्ट्रवादीची ‘दादा’ मंडळी गप्प
कल्याण-शिळफाटा रस्त्याचे मजबुतीकरण व पुनर्पृष्ठीकरणाचे काम २००५ मध्ये माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्या काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. या रस्ते कामासाठी ‘ना हरकत’ देताना महामंडळाने कल्याण शहराबाहेरून गेलेला एक किलोमीटर लांबीचा पत्रीपूल व्हाया गोविंदवाडी दुर्गाडी किल्ला पालिकेकडून कोणतेही शुल्क न आकारता बांधून द्यावा, अशा अट सर्वसाधारण सभेने प्रशासनाला घातली होती. ना हरकत देण्यास महासभेने विरोध केला होता. त्या वेळी राष्ट्रवादीची दादा मंडळी या विषयात पडली होती, अशी त्या वेळी चर्चा होती. शिळफाटा रस्ता कामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्या वेळची ठाणे, मुंबईतील ‘दादा’ मंडळी आघाडीवर होती. शिळफाटा पूर्ण होऊन आणि त्यावर कोटय़वधी रुपयांचा टोलवसुली करून आता पाच ते सहा वर्षे झाली आहेत. तरीही गोविंदवाडी रस्त्याचे भिजत घोंगडे कायम आहे.
याउलट रस्ते कामासाठी महामंडळाने पालिकेकडे वारंवार काही रकमेची मागणी केली. महामंडळाला भूसंपादन, पुनर्वसन कामात पालिकेने मोलाचे सहकार्य केले आहे. आता रस्ता रखडला आहे, पण या विषयावर ठाणे, मुंबईतील राष्ट्रवादीची दादा मंडळी एक शब्द बोलण्यास तयार नाहीत. दादांचे ‘शिष्यगण’ कल्याणमध्ये राहतात. त्यांना कल्याणमधील वाहतूक कोंडी दिसत नाही का, असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत.