ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने सरकते जिने उपलब्ध करून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय म्हणजे आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. ठाण्याहून नवी मुंबईसाठी उपनगरी सेवा सुरू करताना ठाणे स्थानकात कोणतीही सुधारणा न केल्याने अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन पूल अपुरे पडू लागल्यानंतर मध्यंतरी तिसरा पादचारी पूल उभारण्यात आला. मात्र तरीही प्रवाशांची कोंडी कमी झाली नाहीच, उलट या तिसऱ्या पुलामुळे पीकअवरमध्ये  फलाटांवर प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा नसते. त्यात आता सरकत्या जिन्यांची भर पडली तर फलाटांवर उभे राहायलाही जागा शिल्लक राहणार नाही.
नवी मुंबईत उपनगरी सेवा सुरू झाल्यानंतर ठाणे स्थानकाचा जंक्शन स्थानकाच्या धर्तीवर विकास करणे गरजेचे होते. मात्र ठाण्याबाबत रेल्वेचे धोरण कायम धरसोडीचे राहिले. मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानकाचा पर्याय कागदावरच राहिला. त्यानंतर ठाणेकरांना ‘वर्ल्ड क्लासह्णचे स्वप्न दाखविले गेले. प्रत्यक्षात यापैकी काहीच घडले नाही. उलट तीन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या ठाणे-कर्जत/कसारा शटल सेवेच्या ३० फेऱ्या प्रशासन अद्याप कार्यान्वित करू शकली नाही. या फेऱ्यांमुळे खरेतर ठाणे स्थानकातील गर्दीचे परिणामकारकपणे व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे. त्यापैकी काही फेऱ्या १५ फेब्रुवारी रोजी सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार होता. मात्र त्याविषयी मौन पाळणाऱ्या रेल्वेने सरकत्या जिन्यांची घोषणा केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
प्रवाशांचे ‘कल्याण’
व्हावे म्हणून..
सध्या कल्याण दिशेच्या सर्व धीम्या उपनगरी गाडय़ा ठाणे स्थानकात फलाट क्रमांक दोनवरून सुटतात. ठाण्यानंतर येणाऱ्या कळवा, मुंब्रा तसेच दिवा या स्थानकातही फलाट त्याच दिशेने येतात. कारण तिथे दुसरा पर्यायच नाही, पण ठाण्यात पीकअवरमध्ये काही गाडय़ा फलाट क्रमांक तीनवर आणल्या, तर प्रवाशांना गाडीत शिरणे सोयीचे जाईल. कारण पुढील स्थानकांत उतरणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे ठाण्यातील प्रवाशांना गाडीत चढता येत नाही. तीन नंबर फलाटावर गाडी आणली तर उलटय़ा बाजूला फलाट येऊन प्रवाशांना गाडी पकडणे सोयीचे होईल.

.