पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला. मात्र, जिल्ह्यात अजूनही समाधानकारक व पाणीपातळी वाढण्याइतपत पाऊस पडलेला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नगदी पीक मानल्या जाणाऱ्या कांद्याच्या लागवडीवर पाणीटंचाईचे सावट दिसत आहे. पावसाच्या बेभरवशामुळे जिल्हाभरात १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा लागवड होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘साधला तर कांदा, नाही तर रेंधा’ असे कांदा पिकाबाबत नेहमीच म्हटले जाते. चांगला भाव मिळाला, तर शेतकऱ्यांना मनमुराद पसे मिळवून देणारे हे पीक गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादकांना कर्जाच्या खाईत ढकलणारेच ठरले आहे. कधी निसर्गाची अवकृपा, तर कधी बाजारपेठेत अचानक कोसळणाऱ्या दरामुळे कांदा उत्पादकांना सतत फटका बसत आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील हे पीक जागेवरच सुकून गेले. त्यामुळे बऱ्यापकी दर असूनही शेतकऱ्यांचा काहीच फायदा झाला नाही.
मागील ४-५ वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाकडे कल वाढला. कमी अवधीत नगदी पसा देणारे पीक असल्याने शेतकरी वरचेवर कांदा उत्पादन घेऊ लागले आहेत. प्रामुख्याने तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यांत कांदा लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली. तुळजापूर तालुक्यात सुमारे ६ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. त्याखालोखाल उस्मानाबाद साडेतीन हजार, कळंब ४७० हेक्टर, उमरगा १ हजार १५०, लोहारा ५१२, भूम १ हजार २००, परंडा १ हजार, तर वाशी तालुक्यात ९२० हेक्टर अशी जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात येते.
साधारणत जूनमध्ये वेळेवर पावसाचे आगमन झाल्यास लागलीच शेतकरी बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्याच्या कामाची घाई करतात. सव्वा ते दीड महिन्यात तयार झालेली रोपे लागवडीस येतात. त्यानंतर ऑगस्टमध्ये कांदा लागवडीची लगबग सर्वत्र सुरू होते. मात्र, पावसाने ओढ दिल्यास कांदा लागवडीस उशीर होतो. उशिराच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना आíथक फटका बसतो, असा अनुभव आहे. त्यासाठीच आघाडीला पीक तयार करण्यासाठी कांदा उत्पादकांकडून प्रयत्न केले जातात.
कांद्याच्या पिकाला शेतकऱ्यांमध्ये ‘जुगार’देखील म्हटले जाते. मुबलक पाणी व बाजारात दर चांगला मिळाल्यास कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणाऱ्या कांदा पिकाच्या यंदाच्या हंगामातील लागवडीवर प्रश्नचिन्ह दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन सव्वा-दीड महिना लोटला. परंतु अजूनही जिल्ह्याच्या सर्वच भागात पाण्याची समस्या कायम आहे. मागील ४-५ दिवसांत उस्मानाबाद, तुळजापूर सोडला, तर इतरत्र कोठेच पाऊस बरसला नाही. आजपर्यंत झालेल्या थोडय़ा-फार पावसावर खरीप पिके तरली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीतील पाणीपातळी अजूनही वाढली नाही.
जुल महिना निम्मा संपत आला. परंतु किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात कोठेच अजून कांद्याची रोपे तयार करण्याच्या कामास वेग आल्याचे दिसत नाही. ११०० ते १३०० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केलेले कांदा बियाणे रोपे तयार करण्यास शेतात पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.