ऋतू बदलताना साथ येणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची पावसाळ्यात वाढलेली संख्या आणि पंधरा दिवसांत चौघांचा झालेला मृत्यू धोक्याची सूचना देणारा आहे. मात्र फेब्रुवारी ते एप्रिल या काळात झालेल्या ७० टक्क्यांहून अधिक मृत्यूंना अयोग्य निदान, लक्षणे दिसू लागल्यापासून उपचार मिळेपर्यंत गेलेला आठवडाभराचा काळ तसेच आधीपासून असलेला आणखी एखादा आजार कारणीभूत असल्याचे पालिकेच्या मृत्यू अवलोकन समितीला दिसून आले होते. या तीनही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगणे हा स्वाइन फ्लूची गुंतागुंत रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय ठरू शकेल. फेब्रुवारी ते एप्रिल यादरम्यान शहरात स्वाइन फ्लूने ४२ मृत्यू झाले होते. (तोपर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या १५ हजारांहून अधिक झाली होती) त्यातील १५ मृत्यू हे शहरातील होते. या मृत्यूंपकी २७ जणांसंबंधी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीमागे मृत्यूमागची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याचा हेतू होता. या २७ रुग्णांपकी १२ रुग्णांना लक्षणे दिसू लागल्यानंतर सहा दिवसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संसर्ग दिसू लागल्यावर योग्य उपचार मिळण्यासाठीही पाच दिवसांचा कालावधी गेला होता. या २७ पकी १७ जण रुग्णालयात दाखल झाल्यावर चार दिवसांत मृत्यू पावले, असे पाहणीत आढळले होते. योग्य उपचार मिळण्यास विलंब होण्यासोबतच रुग्णांचा पूर्वेतिहासही महत्त्वाचा ठरतो. रुग्णाला आधीच एखादा गंभीर आजार असेल तर स्वाइन फ्लू झाल्यास अधिक गुंतागुंत निर्माण होते. या २७ पकी सात जणांना मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. याशिवाय मूत्रिपड विकार, कर्करोग, हृदयविकार तसेच फुप्फुसांना संसर्ग असल्याचे दिसून आले होते. या २७ पकी ९ जणांना मात्र कोणताही इतर आजार नव्हता.
राज्यातील स्वाइन फ्लूच्या मृत्यूंमध्येही ३५ टक्के रुग्णांना इतर कोणताही गंभीर आजार नसल्याचे आढळले. संसर्गामुळे रोगप्रतिकारक यंत्रणेचे कार्य (हायपरअ‍ॅक्टिव इम्युनो सिस्टीम) बिघडल्याने एकूण मृत्यूंपकी एकतृतीयांश मृत्यू झाले होते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी या दोन्ही संस्थांनी केलेल्या अभ्यासात हे दिसून आले आहे. अर्थात स्वाइन फ्लूचा संसर्ग इतर वेळी अत्यंत कमी असतो आणि अनेक रुग्णांना रुग्णालयात जाण्याचीही गरज भासत नाही, असे राज्य संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे म्हणाले. आतापर्यंत मुंबईत १८ हजारांहून अधिक रुग्णांना स्वाइन फ्लू झाला आहे. सतत बदलत असलेल्या हवामानामुळे ‘एचवनएनवन’ विषाणू इथेच राहणार आहेत. त्यामुळे या फ्लूपासून सावध राहायला हवे, असे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूचा विषाणू भारतात सर्वप्रथम २००९ मध्ये दाखल झाला. सर्वप्रथम मुंबईत या आजाराचे रुग्ण आढळले. त्यानंतर वेगाने पुणे, नाशिक, नागपूपर्यंत ही साथ पसरली. शहरातील दमट वातावरणापेक्षा कोरडय़ा व थंड हवेच्या ठिकाणी स्वाइन फ्लूच्या विषाणूंनी जास्त कहर केला व पुढील दोन वर्षांत पुण्यासह ग्रामीण भागात या साथीचा प्रभाव जास्त आढळला. मुंबईत मात्र २००९-२०१० नंतर स्वाइन फ्लूच्या एचवनएनवन विषाणूंचा प्रभाव कमी होत गेला. इतर फ्लूप्रमाणेच त्याच्या लक्षणांवर उपचार होऊ लागले. या वर्षांच्या फेब्रुवारीत मात्र पुन्हा एकदा स्वाइन फ्लूची राज्यभरात साथ आली व ती मुंबईतही येऊन पोहोचली. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात १८ हजारांहून अधिकांना स्वाइन फ्लूची बाधा झाली. उपचारासाठी मुंबईत आलेल्यांपकी ३९ जण दगावले आहेत. मे महिन्यात स्वाइन फ्लूची साथ कमी झाली होती. मात्र पावसाने घेतलेला ब्रेक व तापमानात होत असलेले चढउतार यामुळे पुन्हा एकदा साथ पसरत आहे.