आयकर आकारणीमुळे सहकारी पतसंस्थांवर अन्याय होत असल्याने त्यांना आयकरातून सवलत देण्याचा आग्रह सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली सहकार भारती या स्वयंसेवी संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडे त्यांच्या मुंबई भेटीत धरला.
पतसंस्थांच्या अन्य प्रलंबित मागण्याही तातडीने सोडविण्यासंदर्भातही यावेळी सिन्हा यांना साकडे घालण्यात आले. आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सहकारी पतसंस्थांचे योगदान लक्षात घेता सभासदांकडून तसेच अन्य संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून आयकर आकारणी केली जाते. या कर आकारणीमुळे पतसंस्थांच्या अडचणींमध्ये भर पडत असून त्यामुळे या करातून सवलत मिळण्यासाठी पतसंस्थांचा आग्रह आहे. मंगळवारी अर्थ राज्यमंत्री मुंबईत आल्यावर सहकार भारतीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन पतसंस्थांच्या विविध अडचणींसदर्भात चर्चा केली. सहकारी पतसंस्थांना सहकारी बँकांचा न्याय न लावता सहकारी बँका व सहकारी पतसंस्थांमध्ये फरक करावा, सहकारी पतसंस्थांच्या लाभांशावर कर आकारणी करू नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांसदर्भात लवकरच रिझव्‍‌र्ह बँक, नाबार्ड व देशभरातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही अर्थ राज्यमंत्र्यांनी शिष्टमंडलास दिली. शिष्टमंडळात सहकार भारतीचे सचिव डॉ. उदय जोशी, श्रीराम देशपांडे आदींचा समावेश होता.