महापालिकेने शहरातील प्लास्टिक कचऱ्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आ. नितीन भोसले यांनी आयुक्तांकडे केली आहे. झपाटय़ाने विकास होणाऱ्या या शहरात कचरा, घनकचरा, सांडपाणी, रस्त्यांचे नियोजन याबाबत शून्यता आढळून येत असल्याचा आरोपही आ. भोसले यांनी केला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी रिकाम्या भूखंडावर कचरा आढळून येतो. बहुतांश भागात अनधिकृत भाजी बाजार सुरू झाले आहेत. विक्रेते आपला भाजीपाला विकल्यानंतर उरलेला सडका माल तिथेच टाकून देतात. शहरात मनपाने विकसित केलेली उद्याने, लेणी, पर्यटन स्थळे, धार्मिक मंदिरे अशा परिसरात स्टॉलधारक प्लास्टिकचा सर्रास वापर करतात. परिणामी या ठिकाणी प्लास्टिक कचऱ्यात वाढ होत आहे. प्लास्टिकवर बंदी असतानाही व्यापारी, छोटे दुकानदार, सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करतात. कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकतात. प्लास्टिक कचऱ्यात वाढ होऊन परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे होणारे साथीचे आजार, संसर्ग यांना नागरिक बळी पडत आहेत. महापालिकेच्या वतीने प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यास निश्चितच नाशिक सुंदर होण्यास मदत होईल, असा विश्वास आ. भोसले यांनी व्यक्त केला आहे.