जिल्हाधिकारी कुरुंदकर यांचे आवाहन
पावसाळ्यात कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याने जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये २ ऑक्टोबपर्यंत अत्यावश्यक व गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी २४ तास कार्यरत ठेवावीत. दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी आलेल्या अशा रुग्णास दवाखान्यात आल्यानंतर वेळेवर औषधोपचार मिळाल्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी केले आहे.
 दवाखान्यात वाहन सुस्थितीत ठेवावे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे शुध्दीकरण दैनंदिन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे, याची खातरजमा करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीत पुरेसा ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध असेल, याची खात्री आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करावी, तसेच ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या ब्लिचिंग पावडरची योग्य प्रकारे साठविल्याची व तपासणीत क्लोरीनचे प्रमाण योग्य असल्याची खात्री करावी. आरोग्य संस्थेच्या ठिकाणी एपिडेमिक किट अद्ययावत ठेवावी, संस्थेच्या ठिकाणी २४ तास किमान एक चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध असावा,  रुग्णांना त्या कर्मचाऱ्याने बसवून घ्यावे व तातडीने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधनिर्मात्यांना आवश्यकतेनुसार त्वरित बोलावून घ्यावे व संबंधित रुग्णांवर वेळीच औषधोपचार होईल, याची दक्षता घ्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणच्या दोन वैद्यकीय अधिकांऱ्यापैकी एका अधिकाऱ्याने एक दिवसाआड बाह्य़रुग्ण व आंतररुग्ण कक्षाते थांबून आरोग्य केंद्रात आलेल्या सर्व अत्यावश्यक रुग्णांवर आवश्यकत औषधोपचार व संदर्भसेवेची कार्यवाही करावी, तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कार्यक्षेत्रात नियमितपणे फिरती करावी, अशाही सूचना त्यांनी केल्या.
कार्यक्षेत्रात साथ आढळल्यास आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह तातडीने घटनास्थळी जाऊन प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्यवाही करावी, एखाद्या गावी साथरोग उद्भवल्यास साथीची माहिती त्वरित वरिष्ठ कार्यालयास व संबंधित कार्यक्रम प्रमुखास द्यावी. प्रामुख्याने कार्यालयीन वेळेनंतर साथरोग नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातून व वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या दूरध्वनी संदेशानुसार तात्काळ कार्यवाही करावी. साथ नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी दूरध्वनीवर उपलब्ध न झाल्यास त्यांच्यावर ताबडतोब शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही त्यांनी संबधित यंत्रणेस निर्देश दिले.