कल्याण-डोंबिवलीतील रेल्वे स्थानक भागातील सर्व रिक्षा वाहनतळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मीटरच्या सक्तीनंतरही रिक्षाचालक प्रवाशांना वाकुल्या दाखवत असल्याचे चित्र या भागात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या रिक्षा स्थानकांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे.
कल्याण-डोंबिवलीतील सर्व रिक्षांना मीटर बसविण्यात आले आहेत. तरीही रिक्षाचालक प्रवाशांना जुमानत नाहीत, असे चित्र आहे. शहरात मीटर पद्धतीचा अवलंब व्हावा, यासाठी आरटीओचे अधिकारी तसेच वाहतूक पोलीसही गेल्या काही दिवसांपासून राबताना दिसत आहेत, तरीही काही रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे वाहतुकीला नकार देत आहेत. आरटीओ, वाहतूक विभागाकडे पुरसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकाचे फावत आहे. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी प्रत्येक रिक्षा वाहनतळावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. त्या कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष जवळच्या वाहतूक किंवा आरटीओ कार्यालयात ठेवावा. ज्या रिक्षाचालकाने प्रवाशांबरोबर उद्दामगिरी केली आहे, त्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला मिळून त्या रिक्षाचालकावर कारवाई करणे आरटीओना शक्य होणार आहे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केली. म्हात्रे यांनी काही स्थानिक प्रवासी संघटनांसोबत एक पत्र राज्याच्या परिवहन विभागाकडे पाठविले आहे. या सर्व कामांसाठी परिवहन विभागाने काही निधीची तरतूद करून तातडीने सीसीटीव्ही कामे बसविण्याची कामे हाती घ्यावीत असे म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे. वाहनतळांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविल्यास रिक्षाचालकांवर जरब बसेल. परंतु, हे तांत्रिक स्वरूपाचे काम असल्याने या कामासाठी वेळीच निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.