पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या तसेच वृत्तसंकलनाचे कॅमरे तोडून पुरावा नष्ट करणाऱ्या संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसह या घटनेचा निषेध करणारे निवेदन येथील श्रमिक पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या घटनेला एक महिना लोटूनही पोलीस दल व जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी डी. डी. िशदे व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना देण्यात आले.
होळीच्या निमित्ताने धुळवळीच्या दिवशी २७ मार्चला जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गणेशनगर येथील उपविभागीय कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभाग व काही कंत्राटदारांनी गणेशनगर येथील शासकीय इमारतीच्या आवारात मटन व दारू पार्टीचे आयोजन केले होते. बँडच्या तालावर मद्याच्या धुंदीत टुन्न असलेले ४०-५० लोक आरडाओरड करीत असल्याने परिसरातील नागरिकांनी पत्रकारांकडे तक्रार केली. या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी काही पत्रकार त्या ठिकाणी गेले असताना दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी पत्रकारांना शिवीगाळ व धमकीच दिली नाही, तर त्यांच्या हातातील कॅमरे तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील वृत्त टीव्ही चॅनल व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. याप्रकरणी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मिलन लिल्हारे यांनी वृत्तसंपादकाची परवानगी घेऊन ३१ मार्च रोजी रितसर तक्रार नोंदविली. मात्र, शहर पोलिसांनी तब्बल १५ दिवसांनी गुन्हा दाखल केला असला तरी कारवाई मात्र शून्य आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची व्हीडीओ कॅसेट पोलीस दलाला देण्यात आली आहे. तरीही पोलीस अधिकारी संबंधित आरोपीचे नाव माहीत नसल्याचे कारण पुढे करून या प्रकरणाला बगल देत आहेत, अशी शंका निर्माण झाली आहे.
या प्रकरणातील गुन्हेगारांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, या मागणीसह प्रभारी निवासी जिल्हाधिकारी जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांना निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी शिष्टमंडळाला योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शिष्टमंडळात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष एच. एच. पारधी, उपाध्यक्ष दिलीप लिल्हारे, सुरेश येडे, विकास बोरकर, रवी आर्य, महेंद्र बिसेन, जयंत शुक्ला, हिदायत शेख, अभय अग्रवाल, अनंत मेश्राम, हरीश मोटघरे, मिलन लिल्हारे, लिमेशकुमार जंगम व इतर पत्रकार उपस्थित होते.