अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र अभ्यासक्रमाची समकक्षता निश्चित करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अधिव्याख्याताच्या नोकरीमध्ये न्याय मिळावा, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत महाराष्ट्र तंत्रशिक्षण सेवा गट अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत ‘ड्रेस डिझायनिंग अ‍ॅण्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयातील अधिव्याख्याता पदासाठी अभियांत्रिकी शाखेतील ड्रेस डिझायनिंग व गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग किंवा समकक्ष अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. अभियांत्रिकी शाखेतील हा पदवी अभ्यासक्रम महाराष्ट्रात कोणत्याही विद्यापीठात उपलब्ध नाही. यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ही जाचक अट नव्हती. अभियांत्रिकी शाखेतील पदवी अभ्यासक्रम महाराष्ट्रात उपलब्ध नसताना सदर पदाकरिता ही अर्हता निश्चित करणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे मनसेच्या विद्यार्थी आघाडीने म्हटले आहे. जाचक अटीमुळे पदाकरिता महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांचीच नेमणूक होण्याची शक्यता अधिक असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. अभ्यासक्रमात गरीब विद्यार्थिनींचीच संख्या अधिक आहे. महाराष्ट्राबाहेर जाऊन या अभ्यासक्रमाची अभियांत्रिकी पदवी प्राप्त करणे या विद्यार्थिनींसाठी अशक्य आहे. त्यामुळे हा पदवी अभ्यासक्रम महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये उपलब्ध करून किमान पहिली तुकडी शिकून बाहेर पडेपर्यंत उपरोक्त शासन निर्णयास त्वरित स्थगिती द्यावी, तोपर्यंत ही पदे पूर्वीच्याच अर्हतने भरण्यात यावीत अशी मागणी मनसे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे, अ‍ॅड. अजिंक्य गीते, बबनराव धोंगडे आदींनी केली आहे.