स्वयंरोजगार करण्यासाठी उत्सुक असलेल्या पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या तालुक्यातील बेरोजगारांना, युवकांना, विविध कर्जाची माहिती देण्यासाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्यास सोलापूर कार्यालयाकडे प्रत्येक वेळी धाव घ्यावी लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे विभागीय कार्यालय पंढरपुरात करावे, अशी मागणी काँग्रेस आय. ओ. बी. सी. सेलचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके यांनी केली आहे.
वरील तालुक्यात बेरोजगार युवकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून त्या प्रमाणात मोठे उद्योग व्यवसाय कारखानदारी नसल्याने सर्वसामान्य युवकांना स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही. अशातच विविध योजनांची माहिती घेण्यासाठी सोलापूरलाच जावे लागते.
सध्या जिल्हा उद्योग केंद्राचे एक कर्मचारी दर गुरुवारी पंढरीत येतात, हे खरे असले तरी या कर्मचाऱ्यांच्या सोलापूर येथून पंढरपूरला येण्याच्या वेळा नक्की नसतात. दर गुरुवारी हे अधिकारी पंचायत समिती आवारात येतात म्हणून अनेक युवक या परिसरात रेंगाळताना दिसून येतात. तेव्हा या अधिकाऱ्याचा पत्ताच नसतो.
या करता हे जिल्हा उद्योग केंद्राचे विभागीय कार्यालय पंढरपुरात होणे गरजेचे आहे. या बाबतचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोढे यांना घोडके यांनी दिले आहे.