महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अत्यंत कमी असल्याने नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी जुने नाशिक भागातील साई सेवक मित्र मंडळाने पालिका उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंडळाने निवेदनात महापालिका शाळांमधील गैरसोयींकडेही लक्ष वेधले आहे. मनपा शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांना सातवीपुढील शिक्षण घेणे अवघड होते. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याच्या कारणाने शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महानगरपालिकेने आठवी ते दहावीचे वर्ग तसेच महाविद्यालयही सुरू करण्याची मागणी मंडळाने केली आहे. महापालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमावेत, विद्यार्थ्यांना टवाळखोरांचा त्रास होऊ नये, शाळांचा वापर जुगार खेळण्यासाठी होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करावी, प्रत्येक शाळेत पाण्याची नवीन टाकी बांधावी, नवीन स्वच्छतागृह बांधावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी अंकुश राऊत, पवन वाडेकर, विकी गायधनी आदी उपस्थित होते.