राजर्षी शाहू छत्रपतींचा अर्धपुतळा बिंदू चौकामध्ये चौथऱ्यावर बसविण्यात यावा, अशी मागणी महापौर जयश्री सोनवणे यांच्याकडे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.    
कोल्हापूर महापालिकेतर्फे बिंदू चौक सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम पूर्ण होत आहे. सध्या बिंदू चौकामध्ये चौथऱ्यावर महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळे व स्वातंत्र्य युद्धातील हुतात्म्यांचे स्मारक (स्मृतिस्तंभ) आहेत. तथापि, पुरोगामी कोल्हापूरची ओळख म्हणून व ज्या फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार कोल्हापूरने साऱ्या महाराष्ट्राला दिला त्यांचे दृश्य प्रकटीकरण म्हणून बिंदू चौकामध्ये राजर्षी शाहूंचा अर्धपुतळा असणे आवश्यक आहे.    
महालक्ष्मी दर्शनाकरिता साऱ्या महाराष्ट्र व देशातून यात्रेकरू व पर्यटकांचा ओघ कोल्हापूरला सतत चालू असतो. पर्यटक बिंदू चौकामध्ये वाहने पार्किंग करण्याकरिता येत असतात. जर त्या ठिकाणी फुले-शाहू-आंबेडकरांच्या अर्धपुतळय़ांचे पर्यटकांना दर्शन घडले तर त्यांचा विचार साऱ्या महाराष्ट्रमध्ये व भारतात जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बिंदू चौक हे आपोआपच एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ होणार आहे.    
शिष्टमंडळात निवास साळोखे, विवेक कोरडे, दिलीप माने, संभाजी जगदाळे, संभाजी देवणे, कॉ. रघुनाथ कांबळे, रुक्मिणी कांबळे, सतीशचंद्र कांबळे आदींचा सहभाग होता.