विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावात श्रींच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त येतात. यात परराज्यातील भक्तांचा समावेश असल्याने शेगाव रेल्वे स्थानकावर जास्तीत जास्त सुपरफोस्ट रेल्वे गाडय़ांना थांबा देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
२४ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते आमदार भाऊसाहेब फुंडकर, सहा. रेल्वे महाव्यवस्थापक बॅनर्जी, एन.के.गुप्ता, गोहल, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी उपस्थित होते.
रेल्वे गेटमुळे अनेक नागरिक व रुग्णांना याचा त्रास होत होता. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून चर्चासुध्दा केली. याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने या रेल्वे पुलाला मान्यता दिली. या उड्डाण पुलास केंद्र शासन व राज्य शासन खर्च उचलणार आहेत. काम दोन वर्षांचे अगोदर पूर्ण होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेगाव येथून दररोज १८ सुपरफोस्ट गाडय़ा येथे न थांबता निघून जातात. याचा भक्तांना त्रास होत असून या ठिकाणी जास्तीत जास्त गाडय़ांना थांबा देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. अकोला ते कांचीकुंडा ही इंटरसिटी एक्स्प्रेस अकोला येथे १५ तास थांबते. या वेळेत ही गाडी अकोला ते भुसावळपर्यंत सुरू करण्यात यावी जेणे करून आंध्रप्रदेशला जोडण्यात येईल. शेगाव हे मॉडेल रेल्वे स्टेशन आहे, मात्र या ठिकाणी प्रवासी व भक्तांसाठी मूलभूत सुविधा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही खासदार जाधव यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अविनाश दळवी यांनी शेगाव रेल्वे स्थानकावर भक्तांच्या सोयीसाठी चौकशी कक्ष, रेल्वे स्थानकावर संपूर्ण शेड, नवीन दादरा, तसेच वृध्द, गरोदर माता, विकलांगांना प्रवास करतांना प्लॉटफॉर्म कमी उंचीचा असल्याने त्रास होत असून त्याची उंची वाढविण्याची विनंती केली, तर ४० वर्षांंपासून ओव्हरब्रिज जसेच्या तसे असून लवकरात लवकर तयार करण्यात यावा जेणे करून प्रवाशांना त्रास होणार नाही.शेगाव विकास आराखडय़ात अंतर्गत रेल्वे समांतर दोन्ही कडील रोडचे काम थांबलेले असून, रेल्वे प्रशासनाने यास तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी केली, तर संतनगरीत येऊन मी धन्य झालो. रेल्वे प्रशासनाला निधी कमी असून तो मिळाल्याबरोबर शेगावच्या कामांना प्राधान्य देऊ व कामास सुरुवात होणार, असे सहा. रेल्वे महाव्यवस्थापक बॅनर्जी यांनी सांगितले. यावेळी शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.