सोलापुराजवळ मुळेगाव तांडय़ात कार्यरत असलेल्या सोनांकुर एक्स्पोर्ट प्रा. लि. या खासगी कत्तलखान्यामुळे दरुगधीयुक्त वायू व जलप्रदूषण निर्माण होऊन परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही याप्रकरणी सदर कत्तलखान्याच्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश दिल्याने त्यानुसार हा कत्तलखाना तातडीने बंद करावा, अशी मागणी विविध संस्था व संघटनांनी केली आहे.
यासंदर्भात सावली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात अ‍ॅड. गोिवद पाटील (अंनिस), रवींद्र मोकाशी (परिवर्तन अकादमी), योगाचार्य विठ्ठल जाधव, विलास शहा, बापूराव जगताप, प्रा. म. हनीफ शेख, श्रीशैल लातुरे, शीला देशमुख (माउली सेवा प्रतिष्ठान), अ‍ॅड. खतीब वकील (अ. भा. नागरिक ग्राहक संघटना), राम गायकवाड (मराठा सेवा संघ), राजेंद्र शहा, विश्वनाथ निरंजन, नामदेव पवार, मनोज शिंदे (छत्रपती ग्रुप), संजय पाटील, राजकुमार भडंगे, केतन शहा आदींचा समावेश होता.
२००६ पासून मुळेगाव तांडय़ावर सुरू असलेला सोनांकुर यात्रिकी कत्तलखाना आसपासच्या परिसरात अनारोग्य फैलावत आहे. प्रदूषणाचे प्रमाणही वाढवत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक प्रशासनाचे अहवाल वरिष्ठांकडे यापूर्वीच पाठविण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयानेही गेल्या ६ डिसेंबर रोजी हा कत्तलखाना बंद करण्याचा आदेश दिला आहे. परंतु तरीसुद्धा आजतागायत हा कत्तलखाना बंद न राहता चालूच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून हा कत्तलखाना विनाविलंब बंद करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात योग्य कायदेशीर कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल, असा इशाराही या शिष्टमंडळाने दिला.