शिवाजी विद्यापीठाचे वार्षिक अर्थसंकल्प ऑनलाइन करून ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहण्यास उपलब्ध करून द्यावे यासह अन्य मागण्या विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भातील सविस्तर निवेदन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांना सादर करण्यात आले.
विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यातील व परराज्यातीलही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार व विद्यार्थ्यांकडून सादर झालेल्या गाऱ्हाण्यांमधून सदरचे निवेदन तयार करण्यात आले. शिवराज मोरे यांच्याच कार्यप्रणालीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दर महिन्याला छात्रपंचायतीची सभा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा अशी भूमिका आहे. कुलगुरूंना निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्यासमवेत प्रभारी कुलगुरू डॉ. अशोकराव भोईटे, बीसीयूडी संचालक ए. बी. राजगे तसेच शिवराज मोरे यांच्या शिष्टमंडळात प्रदेश निरीक्षक गुलाबसिंह राजपूत, सातारा जिल्हा उपाध्यक्ष दिग्विजय पाटील, अमित जाधव, राहुल पवार, राहुल चव्हाण, प्रकाश पिसाळ आदी पदाधिका-यांची उपस्थिती होती. यादरम्यान, विद्यापीठाचे वरील पदाधिकारी व विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळात विद्यार्थ्यांच्या विविध विषयांवर चर्चा झाली.