महापालिका पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता शशिकांत बोरोले यांना १९ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी शहिद भगतसिंग कर्मचारी संघटनेने केली आहे. कामगार संघटनेचे अनिल नाटेकर व विजय पवार यांनी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांना या संदर्भात मागणीचे निवेदनही दिले आहे.
वाघूर पाणी पुरवठा योजना या १६९ कोटी रुपयांच्या प्रकल्पात अनियमितता व भ्रष्टाचार प्रकरणी महापालिकेत विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी एस. एम. वैद्य यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चौकशी अधिकाऱ्यांनी वाघूर प्रकल्प प्रकरणाची चौकशी पूर्ण करून संबंधित प्रकल्प अभियंता शशिकांत बोरोले यांना १९ कोटी रुपयांच्या असमायोजित रकमेच्या अपहार प्रकरणी दोषी ठरविले आहे. हा अहवाल तत्कालीन प्रभारी आयुक्त सोमनाथ गुंजाळ यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तो अस्थापना अधीक्षक ओमप्रकाश पटाईत यांच्याकडे तातडीने पाठविला. त्यात बोरोले यांच्यावर आवश्यक कारवाई करून वसूलपात्र रक्कम तातडीने वसूल करण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र चार महिने झाल्यानंतरही संबंधित अस्थापना अधीक्षकांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करत बोरोले यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. अहवालावर कारवाई करण्यास कुचराई केली म्हणून पटाईत यांच्यावर निलंबनाची तर उपअभियंता बोरोले यांच्याविरूध्द बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.