सोलापूर जिल्ह्य़ातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या नेमणुकांना  नियमबाह्य़ व बेकायदा मान्यता दिल्याने निलंबित झालेल्या शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांची कसून चौकशी करून बडतर्फ करावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघटनेने केली आहे.
यासंदर्भात शिक्षण संचालकांकडे संघटनेचे अध्यक्ष मोहन मोरे व सरचिटणीस सुरेश पाटील यांनी निवेदन पाठविले आहे. शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांनी नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने ८६ शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या नेमणुकांना मान्यता दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. शाळेत अतिरिक्त शिक्षक असताना त्याच शाळेत पुन्हा दोन शिक्षकांना मान्यता देणे, अनुशेष असताना त्याकडे दुर्लक्ष करून नव्याने शिक्षक मान्यता देणे, बंदी असतानाही केलेली शिक्षक भरती, जाहिरात प्रसिध्द न करता भरती केलेल्या शिक्षकांना मान्यता देणे आदी प्रकार घडल्याचे दिसून आले. त्याची दखल घेऊन शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांना सेवेतून निलंबित केले आहे.
तथापि, ही निलंबनाची कारवाई पुरेशी नसून नजीकच्या काळात थातूर मातूर विभागीय चौकशी होऊन व यंत्रणेला ‘समाधानी’ करून शिक्षणाधिकारी विद्या शिंदे पुन्हा सेवेत येण्याची भीती व्यक्त करीत शिक्षकेतर सेवक संघटनेने नि:पक्ष विभागीय चौकशी होऊन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.