जामखेड तालुक्याला चौंडी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होत आहे, मात्र या बंधाऱ्यातील पाणी दहा दिवसांत संपेल, तेव्हा जामखेडसाठी कर्जत तालुक्यातील मांदळी येथून टँकर भरण्यास परवानगी मिळावी, असे पत्र तहसीलदार जैयसिंग भैसडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
सध्या जामखेड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. तालुक्यात ७१ टँकरने ४९ गांवे, ३१ वाडय़ावस्त्यांना १८४ खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये खैरी प्रकल्पामधून ६ टँकरच्या १६ खेपा, चौंडी बंधाऱ्यातून ३७ टँकरच्या १०२ खेपा, व इतर अधिग्रहित  केलेल्या विहिरींमधून ८ टँकरच्या २४ खेपा करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय मांगी तालुका करमाळा व कर्जत तालुक्यातील मांदळी येथून काही टँकर्स जामखेड तालुक्यासाठी पाणीपुरवठा करीत आहेत.
तालुक्यातील वाकी व चौंडी येथील विहीर व बंधाऱ्यांचे पाणी वातावरणातील प्रचंड उष्णता पाहता आणखी फक्त १० दिवस पुरेल, त्यामुळे तिथून पुढे नागरिकांना पाणीटंचाईची झळ आणखी बसणार आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील मांदळी व करमाळा तालुक्यातील मांगी तलावामधून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. जामखेड शहराला दररोज १० लाख लीटर पाण्याची आवश्यकता आहे. पण टँकर्सने अतिशय अपुरे पाणी मिळते. आज १० ते ११ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. सरपंच कैलास माने हे उपलब्ध पाणी नागरिकांना पुरवत आहेत, त्यासाठी त्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. आडातच नाहीतर पोहऱ्याच कोठून आणायचे असा प्रश्न माने यांना पडला आहे.