महाराष्ट्र केसरी संजय पाटील खूनप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अॅड. उदयसिंह पाटील यांच्या ब्रेनमॅपिंग, लाय डिटेक्टर व नार्को चाचणीची तपासी अधिकाऱ्यांची मागणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी फेटाळली. या निर्णयावर सरकार पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याचे सहायक सरकारी वकील अॅड. मडके यांनी सांगितले.
पहिलवान संजय पाटील यांच्या खूनप्रकरणी अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी न्यायालयाच्या परवानगीने केलेल्या जादा तपासात अॅड. उदयसिंह पाटील यांना अटक झाली आहे. या गुन्ह्याच्या जादा तपासामध्ये महत्त्वाच्या पुराव्यापर्यंत पोहचण्यासाठी अॅड. उदयसिंह पाटील यांची ब्रेनमॅपिंग, लाय डिटेक्टर व नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळण्यासाठी अमोल तांबे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विकासराव पाटील-शिरगावकर व अॅड. मडके यांनी तर बचाव पक्षातर्फे अॅड. धर्यशील पाटील व ताहेर मणेर यांनी म्हणणे मांडले होते.