सोयाबीनचे बियाणे गतवर्षी पावसात भिजल्याने काळे पडले असून उगवण शक्तीत नापास होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाने उगवण शक्तीचे प्रमाण ६५ टक्के करावे, अशी मागणी येथे करण्यात आली.
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे महाबीजचे डॉ. वानखेडे यांनी बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी बीज प्रमाणिकरण अधिकारी डॉ. एम. झेड. शेख, विपणन महाबीजचे महाव्यवस्थापक व्ही. टी. बोरकर, बाळासाहेब काळे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सी. टी. सूर्यवंशी, कृषी अधिकारी एम. व्ही. अली, पंचायत समितीचे उपसभापती रितेश काळे, आदी उपस्थित होते. २०१३च्या खरीप हंगामातील पात्र प्रमाणित सोयाबीन बियाणे महाबीजच्या बीज प्रक्रिया केंद्रावर तात्काळ जमा करावेत अन्यथा २०१४च्या हंगामात बिजोत्पादन कार्यक्रम देताना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी दिला.  
पुढे बोलताना डॉ. वानखेडे म्हणाले, महाबीजच्या प्रचलित भाग हस्तांतरण पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. खरीप हंगाम २०१३मध्ये उत्पादित सोयाबीन बियाणे परतीच्या पावसामुळे खराब झाले आहे. यामुळे सोयाबीन उगवण शक्तीचे प्रमाण ६५ टक्क्यापर्यंत निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्याचे कृषी व पणन अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉ. वानखेडे यांनी दिली. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. वानखेडे यांनी उत्तरे दिली. तसेच ३० डिसेंबर रोजी महाबीज भागधारकांच्या अकोला येथे होणाऱ्या वार्षकि सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.