कल्याण-डोंबिवली परिसरात काही ठराविक ठिकाणी काही व्यक्ती नियमित नशापान करीत असतात. अशी ठिकाणे शोधून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गुंगीचे औषध, त्याचे प्रकार याविषयीची माहिती अशा अड्डय़ांवरून दिली जाते. त्याचा वापर काही मंडळी आपल्या स्वार्थी हेतूसाठी करतात. डोंबिवलीत एका तरुणीला गुंगीचे औषध देऊन झालेल्या बलात्काराच्या प्रकारातून या चर्चेला सुरुवात झाली आहे. साधी डोकेदुखीची गोळी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाही. मग गुंगीची औषधे मुलांच्या हातात कोठून पडतात, याचा पोलिसांनी शोध घ्यावा. मुळावरच घाव घातला तर सध्या जे गैरप्रकार कल्याण- डोंबिवली परिसरात सुरू आहेत त्याला आळा बसेल अशी नागरिकांची मागणी आहे. पालकांनी आपल्या मुलाला, मुलीला आपल्या मित्र परिवारात किती मिसळायचे याविषयी जाणीव करून द्यावी. मुलांच्या घरातील जाण्या-येण्याची वेळ, महाविद्यालय, खासगी शिकवणीची वेळ यावर नियंत्रण ठेवावे, अशी पोलिसांची भूमिका आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार, उपायुक्त संजय जाधव असे कर्तव्यतत्पर अधिकारी कल्याण परिमंडळात सध्या कार्यरत आहेत. त्यांनी या कामी पुढाकार घेण्याची नागरिकांची मागणी आहे.