मुंबईच्या रेल्वे लोकल सेवेचे नाशिककडील शेवटचे टोक असलेल्या कसारा रेल्वे स्थानकालगत अद्ययावत बस स्थानक उभारण्याची मागणी येथील मधुकर सांगळे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्य़ातून मुंबईकडे जाण्यासाठी तसेच मुंबईहून नाशिककडे येण्यासाठी बहुतेक प्रवासी रेल्वे लोकल सेवेवर अवलंबून असतात. नाशिक, नगर, धुळे यांसह इतर जिल्ह्य़ातील प्रवासी मुंबईला रेल्वे लोकलने जाण्यासाठी एस. टी. बसद्वारे कसारा येथे येत असतात. त्यामुळे नाशिक, कळवण, लासलगाव, सिन्नर, अकोला, संगमनेर, मालेगाव अशा अनेक बस गाडय़ांची गर्दी कसारा येथे पाहावयास मिळते, परंतु कसारा येथे अद्ययावत बस स्थानक नसल्याने प्रवाशांसह वाहक-चालकांचेही हाल होतात. अरुंद अशा जागेवरच बस थांबवाव्या लागतात. त्याच जागेवर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी असतात. अशा गर्दीतून बस चालविणे म्हणजे कसरतच. ही कसरत वाहक व चालक कित्येक वर्षांपासून करीत असून या भयंकर समस्येविषयी लोकप्रतिनिधींसह एस. टी. संघटनांचे नेतेही आवाज उठवीत नाहीत. रेल्वेने या ठिकाणी अद्ययावत बस स्थानकासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास एस. टी. कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची सोय होईल. रेल्वेने महाराष्ट्र शासनाकडून अनेक ठिकाणी जागा घेतलेली असल्याने त्यांच्याकडून बस स्थानकासाठी जागा मिळणे सहजशक्य आहे. त्यामुळे लवकरात लवकर कसारा येथे बस स्थानक बांधण्याची मागणी सांगळे यांनी केली आहे.