दिवा-सीएसटी रेल्वेच्या मागणीने जोर धरला असताना पनवेल-दिवा-सीएसटी रेल्वेची मागणी रेल्वेमंत्री सूरेश प्रभू यांच्याकडे पनवेलकरांसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाने ही मागणी नुकतीच लेखी स्वरूपात केली आहे. ही मागणी कधी पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे, मात्र या मागणीमुळे पनवेलकरांची इतर दुखणी तरी रेल्वेमंत्र्यांच्या कानावर जातील व पनवेल परिसरातील स्थानकांना पायाभूत सुविधा तरी मिळाव्यात इतकीच माफक अपेक्षा प्रवाशांची आहे.
दिवा-पनवेल मार्गावरील रेल्वे प्रशासनाच्या कारभाराला वैतागून हाताच्या बाह्य़ा वर सारून संतप्ताचा उद्रेक दाखविला. याच आंदोलनाची दखल रेल्वेमंत्र्यांनी घेत दिवा-सीएसटी रेल्वे मागणीविषयी सकारात्मक चर्चा सुरू झाली. त्यामुळे डोंबिवली, कर्जत, कसारा, कल्याण या प्रवाशांना हक्काची रेल्वे मिळण्याच्या स्वप्नाला बहार मिळाला. दिवा-सीएसटी रेल्वे प्रवाशांचा ओघ पाहता पनवेल येथून व्हाया दिवा अशी गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केल्यास कळंबोली, नावडे, तळोजा, आगसन व दातिवली ही स्थानके थेट मुंबईशी जोडली जातील, अशीही मागणी राष्ट्रीय जनता दलाने केली असल्याची माहिती महासचिव संजय गंगनाईक यांनी दिली आहे. ही गाडी सुरू झाल्यास कर्जतच्या प्रवाशांनाही मुंबई सहज गाठता येईल, असेही राजदचे महासचिव गंगनाईक यांनी रेल्वेमंत्री प्रभूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पनवेल-दिवा मार्गावर मालवाहू रेल्वेगाडय़ांचा ताण पाहता या मागणीचा प्रत्यक्षात कधी शुभारंभ होतो, याकडे प्रवासी लक्ष देऊन आहेत.
विशेष म्हणजे तळोजा, नावडे या स्थानकाजवळील लोकवस्ती वाढली आहे. या दोनही स्थानकांतून आजही मोठय़ा संख्येने चाकरमानी प्रवास करतात. या स्थानकांच्या डोक्यावरील पत्रे गायब आहेत. स्थानकात तिकिटाची कायमची सोय नाही, स्वच्छतागृहे ओसाड झालीत.
रेल्वे येईपर्यंत प्रतीक्षेसाठी प्रवाशांना बैठकीचे बाक नाहीत, एवढेच नव्हे तर स्थानकातून वसाहतीपर्यंत या हाकेच्या अंतरावर पथदिव्यांची सोय नाही. पावसाळ्यात या दोनही स्थानकांपर्यंत पोहोचणारे मार्ग चिखलात हरवलेले असतात. अशाच मागण्यांपैकी स्वयंचलित सरकत्या जिन्यांची पनवेलच्या प्रवाशांची मागणी रेल्वेमंत्री प्रभूंकडे गेली आहे.