निवड समितीने सुचविलेल्या तसेच मान्यता दिलेल्या मुद्यांचा जनलोकपालाच्या मसुद्यात समावेश करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना पत्र पाठवून केली आहे. संसदेत लोकपाल तसेच लोकायुक्त विधेयक मांडण्यासाठी दोघांनीही घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हजारे यांनी आपल्या पत्रात स्वागत केले आहे.
निवड समितीमध्ये  सहभागी असलेल्या सर्व पक्षांनी या मुद्यांना सर्वसंमतीने मान्यता दिलेली आहे. निवड समितीने सादर केलेल्या मुद्यांव्यतिरिक्त आणखी सक्षम मुद्यांचा समावेश करून हा कायदा अधिक सक्षम बनविण्याचा संसदेने प्रयत्न केला तर सामान्य जनतेच्या ते हिताचे होईल असेही हजारे यांनी गांधी व जेटली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.