नांदगाव आणि येवला तालुक्यासाठी प्रस्तावित उपविभागीय कार्यालय मनमाड येथे करण्यात यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
काही महिन्यांपूर्वी उपविभागीय कार्यालय कुठे असावे, याविषयी मत-मतांतरे व बरीच चर्चा रंगली. नांदगाव आणि येवला या दोन तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय मनमाडला असावे याविषयी शासकीय स्तरावर एकमत झाले. तत्पूर्वी शासनाच्या आदेशानुसार दोन तालुक्यांचे हे कार्यालय कोठे असावे याबाबत पाहणी करण्यात आली. त्याचा अहवालही मनमाडसाठी सकारात्मक निघाला. येवला आणि नांदगाव या दोन तालुक्यांसाठी मनमाड हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून उपयोगी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मात्र याबाबत शासनाने हरकती आणि सूचना मागविल्या. त्यात सदर कार्यालय मनमाड ऐवजी येवला येथे करावे, अशा अनेक सूचना येऊन मनमाडला विरोध झाला होता. या सर्व हरकती व सूचनांचा अभ्यास करून प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला. त्यात नेमके उपविभागीय कार्यालयासाठी मनमाड की येवला, यापैकी कोणाचे नाव दडले आहे याची उत्सुकता कायम आहे. उपविभागाचे कार्यक्षेत्र दोन तालुक्यांचे केल्याने महसूल यंत्रणा अधिक सक्षम होईल, तसेच जनतेची कामे अधिक जलद व सुलभतेने होतील. त्यादृष्टीने शासनाने हा निर्णय घेतला. दोन दिवसांत याबाबतची अधिसूचना काढण्यात येणार आहे. त्यात नांदगाव आणि येवल्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय कोठे होणार, याचा निर्णय अपेक्षित आहे. २५ ते ३० वर्षांपासून मनमाडकर तालुका व्हावा यासाठी लढा देत आहेत. शासनाने किमान सव्वा लाख लोकसंख्येच्या मनमाड शहराला उपविभागीय अधिकारी कार्यालय मंजूर करावे, अशी मनमाडकरांची अपेक्षा आहे.