जिल्ह्य़ातील पाणी जायकवाडीला सोडू नये यासाठी नेत्यांना एकत्र येण्याची हाक दिली जात असताना दुसरीकडे त्याच धरणातील पाण्यावरून जिल्हातंर्गतच तंटेबखेडे होण्याची चिन्हे आहेत. मुळा धरणातील उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले व डाव्या नाही यावरून आमदार शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अन्याय झाल्याची ओरड केली आहे.
कर्डिले, कांबळे यांच्यासमवेत रामदास धुमाळ, सुधीर धुमाळ, बाळासाहेब खांदे, जगन्नाथ चव्हाण, नानासाहेब कदम, दिपक पठारे आदी नेतेमंडळीही होती. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली व डाव्या कालव्यासाठीही आवर्तन सोडावे अशी मागणी केली. उजव्या कालव्याला पाणी सोडले असताना डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची तक्रार त्यांनी केली.
जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील दुष्काळी स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. राहुरी तालुक्यातील लाभक्षेत्रात येणारी अनेक गावे तहानली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मोठय़ा प्रमाणावर भेडसावत आहे. त्यामुळे शेतकरी मुळा धरणाच्या आवर्तनाकडे लक्ष ठेवून होता. प्रत्यक्षात प्रशासनाने धरणाच्या उजव्या कालव्यासाठी आवर्तन सोडले व डावा कालवा कोरडाच ठेवला. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असल्याचे या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
सध्याच्या दुष्काळी स्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून प्रशासानाने त्यांचा अंत पाहू नये, मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडावे, त्यातून साठवण बंधारे, तळी भरून द्यावीत, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटेल अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.