मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा प्रचाराला रंग भरू लागला आहे. सकाळपासूनच उमेवारांच्या कार्यालयांत प्रचारसाहित्य घेऊन कार्यर्त्यांचे जथ्थे मतदारसंघात प्रचारासाठी बाहेर पडू लागले आहेत. सकाळपासून दुपापर्यंत प्रचार करायचा. दुपारी एखाद्या विसाव्याचा ठिकाणी बसून जेवायचे आणि पुन्हा सायंकाळपर्यंत प्रचार करायच असा दिनक्रम सध्या सुरू आहे. दिवसअखेरीस उमेदवार या प्रचारी कार्यकर्त्यांना त्यांचा मेहनताना टिकवतो. तो पटला तर दुसऱ्या दिवशी पुन्हा यायचे न पटल्यास दुसऱ्या पक्षाचा उमेदवार जास्त पैसे देतो, असे सांगत त्याचा प्रचार करायचा. असा सध्या खाक्या आहे. भाडोत्री कार्यकर्त्यांच्या या नव्या पवित्र्यामुळे उमेदवारांच्या नाकीनऊ आले आहेत. याला फक्त शिवसेनेचा अपवाद आहे.
युती-आघाडी तुटल्या-फुटल्याने अनेक ठिकाणी पंचरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे प्रचारात आघाडी घेण्यासाठी अनेक उमेदवारांना भाडोत्री कार्यकर्त्यांवर विसंबून रहावे लागत आहे.  शिवसेना वगळता अन्य पक्षांना झोपडपट्टय़ा, चाळींमधून धरपकड करून, पैशांचे आमिष दाखवून तरुण-तरुणींची कुमक प्रचारयात्रेमध्ये सहभागी करावी लागत आहे. काही उमेदवारांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून मतमोजणीपर्यंत बक्कळ वेतन देऊन कार्यकर्ते उभे केले आहेत. मात्र, पंचरंगी लढतीमुळे अधिक पैसे देणाऱ्या पक्षाच्या ताफ्यात ‘भाडोत्री’ कार्यकर्ते मंडळी सहभागी होत असल्याने उमेदवारांना चांगलाच भरुदड बसत आहे. एका ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांसाठी दिवसाला सातशे ते हजार रुपये, दोन वेळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण द्यावे लागत आहे. या वाहत्या गंगेत अनेक जण हात धुवून घेत आहेत. तर काही मंडळी राजकीय नेत्यांच्या दमबाजीमुळे नाईलाजाने मिळेल ते पैसे घेऊन पक्षांचे झेंडे मिरवित फिरत आहेत.
पुलाव-बिर्याणीचे आमिष
पूर्वी निवडणुकांच्या काळात शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांची फारशी गरज भासत नव्हती. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते स्वत:हून प्रचारयात्रांमध्ये सहभागी होत होते. मात्र महायुती भंगल्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे चांगलेच वांधे झाले आहेत. मुंबईतील ठिकठिकाणच्या झोपडपट्टय़ा, बैठय़ा चाळींमधून ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांची कुमक विळविण्यात येत आहे. उपनगरांच्या तुलनेत शहरात झोपडपट्टय़ा कमी असल्याने येथील उमेदवारांना कार्यकर्ते मिळविण्यासाठी बरीच आमिषे दाखवावी लागत आहेत. काही उमेदवारांनी शक्कल लढवित पालिकेच्या आरोग्य स्वयंसेविकांची फौज आपल्या प्रचारकार्यासाठी जुंपली आहे. उपनगरात काही भागात अध्र्या दिवसासाठी ३०० रुपये, एक वेळचा नाश्ता आणि जेवण द्यावे लागत आहे. संपूर्ण दिवस उमेदवाराबरोबर राहणाऱ्या ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांला ६०० रुपये दोन वेळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण द्यावे लागत आहे. पूर्वी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते वडापाव अथवा पुरीभाजीवर समाधान मानत होते. परंतु ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यां दुसऱ्या उमेदवाराकडे जाऊ नये यासाठी पुलाव, बिर्याणी, एखादी चांगली भाजी, पराठा-चपाती-पुरीचा बेत आखावा लागत आहे. काही उमेदवारांनी शक्कल लढवून निवडणूक काळात बल्लवाचाऱ्यांना कंत्राट दिले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका
काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारांना शोधूनही कार्यकर्ते सापडत नसल्यामुळे ते हैराण झाले आहेत. संपूर्ण दिवसासाठी ३०० रुपये देऊनही कुणीच येण्यास तयार नसल्यामुळे नाईलाजाने उमेदवारांना या दरात दुपटीने वाढ करावी लागली आहे. तसेच पाणी, नाश्ता आणि भोजनाचीही व्यवस्था करण्याची वेळ या पक्षांच्या उमेदवारांवर आली आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांवरील खर्चात वाढत होऊ लागली आहे. काही ‘भाडोत्री’ कार्यकर्ते सकाळी एका उमेदवाराचा, तर दुपारनंतर दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. अधिक पैसे आणि सुविधा देणाऱ्या उमेदवाराच्या मदतीला ही मंडळी धाव घेऊन आपले खिसे भरण्यात व्यस्त आहेत.
माणशी २० हजार रुपये!
शहरातील भाजपच्या एका उमेदवाराने तर आचारसंहिता जारी झाल्यापासून मतमोजणीपर्यंतच्या काळासाठी कार्यकर्त्यांची फौज आपल्या दिमतीला ठेवली आहे. या ताफ्यातील प्रत्येकाला २० हजार रुपये देण्यात आले असून नेमून दिलेल्या विभागात प्रचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. काँग्रेसच्या काही उमेदवारांकडून ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांना दिवसाला तब्बल आठशे रुपये देण्यात येत आहेत. काही ठिकाणी भाजीवाले, फुलवाले, फेरीवाल्यांना दमबाजी करून प्रचारात सहभागी करून घेण्यात येत आहे. प्रचारफेरीत आला नाहीस, तर धंदा करू देणार नाही, अशी दमबाजी करण्यात येत असल्याने ही मंडळी मिळेल तो रोज घेऊन प्रचारात राजकीय पक्षांचे झेंडे मिरवित फिरत आहेत.