महामार्गावरील सहा सिग्नल सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर सव्‍‌र्हिस रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या वाढत असतानाही या मार्गावरील सहा चौकात असणारी सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची दक्षता घेण्यात येत नसल्याचे पुढे आले आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याआधी उपरोक्त ठिकाणच्या अडचणी दूर कराव्यात असे वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला सूचित केले होते. तथापि, वाहतूक नियमनास सहाय्यभूत ठरणारे उपाय योजण्याच्या मुद्दय़ावर दोन्ही विभागांमध्ये वर्षभरापासून टोलवाटोलवी चालल्याचे अधोरेखित होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने स्वामी नारायण पोलीस चौकी (औरंगाबाद नाका) ते गरवारे पाइंटदरम्यान सहा प्रमुख चौकात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली. त्यात उपरोक्त दोन्ही चौकांसह पाथर्डी फाटा, वडाळा नाका, द्वारका, अहिरराव हॉस्पिटल समोर या ठिकाणांचा समावेश आहे. हे सिग्नल कार्यान्वित असूनही काही अपवाद वगळता ते सुरू झालेले नाहीत. बहुतांश चौकात वाहतुकीचे नियमन पोलिसामार्फत केले जाते. प्रत्येक ठिकाणी येऊन मिळणाऱ्या रस्त्यांची संख्या अधिक असल्याने पोलिसांची दमछाक होऊनही नियमन योग्य पद्धतीने होत नाही. प्रारंभी सर्व सिग्नल नवीन असल्याने ते ‘टाइमर मोड’ ऐवजी ‘ब्लिंकर मोड’वर ठेवण्यात आले. हे सिग्नल नवीन असल्याने वाहनचालकांना ते माहीत होण्यासाठी वेळ दिला गेला. काही काळ सिग्नल ‘टाइमर मोड’वर चालवून चाचपणी करण्यात आली. तेव्हा वेगवेगळ्या त्रुटी समोर आल्या. प्रत्येक ठिकाणची सिग्नल व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी त्यांची माहिती देऊन वाहतूक पोलिसांनी त्रुटी दूर करण्याची मागणी पत्राद्वारे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे केली होती. त्यास वर्षभराचा कालावधी उलटूनही सिग्नल यंत्रणा सक्षमपणे कार्यरत झाल्या नसल्याचे लक्षात येते.
उपरोक्त विभागांमधील या विषयावरील संपूर्ण पत्रव्यवहार माहिती अधिकार कायद्यांन्वये बाळासाहेब कुरूप यांनी प्राप्त केला आहे. सव्‍‌र्हिस रस्त्यांवरील सहा सिग्नल योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी कुरूप हे पाठपुरावा करत आहेत. वास्तविक उड्डाणपूल साकारताना शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने प्राधिकरणाने वाहतूक पोलिसांशी समन्वय राखणे आवश्यक होते. या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने आडगाव नाका, द्वारका चौक, मुंबई नाका, गोविंदनगर चौक, राणेनगर, पाथर्डी फाटा अशा प्रत्येक चौकात वाहतुकीच्या बिकट स्थितीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सिग्नल व्यवस्था कार्यान्वित झाल्यावर अपघातांचे प्रमाण कमी करता येईल. त्यासाठी काही उपाययोजना वाहतूक पोलिसांनी प्राधिकरणाला कळविल्या. त्यात गरवारे सिग्नल येथे अंबड ‘एमआयडीसी’कडून येणाऱ्या मार्गावर सिग्नलपासून दुभाजक टाकणे, ‘एमआयडीसी’कडून पाथर्डी फाटय़ाकडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूचे तारेचे कुंपण काढणे, झाडे तोडून, रस्त्याच्या कोपऱ्यावरील ‘टेलिफोन एक्सेंज’ची डीपी हलवणे,वीज खांब स्थलांतरित करणे तर पाथर्डी फाटा चौकातील सिग्नलसाठी भाजीबाजार हटविणे, टू वे सिग्नल यंत्रणा बसविणे, या चौकात येऊन मिळणाऱ्या सव्‍‌र्हिस रोडचे रुंदीकरण करावे आदींचा समावेश आहे. वडाळा नाका येथे नागसेनवाडी ते नागजी रुग्णालय या मार्गावर अंतर अधिक असल्याने या ठिकाणी दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी भुयारी मार्ग तयार करावा, नागसेनवाडी रस्त्यास रस्ता दुभाजक टाकणे याचाही अंतर्भाव आहे. द्वारका चौकातील वेगळीच अडचण भेडसावते. या ठिकाणी सिग्नल व्यवस्था सुरू केल्यास एका तासात सिग्नल यंत्रणेचे सात ते आठ फेरे पूर्ण होत असतील तर प्रत्येक दिशेला किमान एक ते दीड किलोमीटर इतकी लांब रांग लागते. यामुळे काठेगल्ली व वडाळा नाका या सिग्नल व्यवस्थेवरही परिणाम होतो. सव्‍‌र्हिस रस्त्यांचे रुंदीकरण करणे आणि सर्व बाजूने डाव्या बाजूचे कोपरे मोकळे केल्यास सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करता येईल असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. अहिरराव हॉस्पिटलसमोरील चौकात दोन्ही बाजूचे सव्‍‌र्हिस रस्ते आणि मुख्य रस्ता यात जाळ्या बसविणे आवश्यक आहे. जेणेकरून दुभाजक ओलांडून वाहने महामार्गावर येणार नाहीत. तसेच सर्व बाजूने ‘झेब्रा क्रॉन्सिंग’चे पट्टे मारणे गरजेचे आहे. स्वामीनारायण चौकातील सिग्नल कार्यान्वित करण्यासाठी असेच काही उपाय सूचविण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या मागण्यांकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्यामुळे एकाही चौकातील सिग्नल यंत्रणा ‘टायमर मोड’वर सुरू होऊ शकलेली नाही. वाहतूक पोलिसांनी पत्र पाठविण्याचा सोपस्कार पार पाडत चेंडू प्राधिकरणाकडे टोलवला. उभय विभागांच्या टोलवाटोलवीत वाहनधारकांना सव्‍‌र्हिस रस्त्यावरून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.