श्री संत गजानन महाराज इंटरसिटी एक्सप्रेस नावाने नागपूर ते शेगाव आणि शेगाव ते गोंदिया ही रेल्वे  सुरू करावी, अशी मागणी एका शिष्टमंडळाने केंद्रीय अवजड मंत्री प्रफुल्ल पटेल यांना केली.
लाखनी येथे कलार समाजाचा दिवाळी मिलन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पटेल उपस्थित होते. श्री संत गजानन महाराज संजीवन समाधी शताब्दी वर्ष २०१० मध्ये साजरे करण्यात आले. श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी विदर्भ आणि छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक शेगाव येथे जात असतात. परंतु विशेष व्यवस्था नसल्याने हजारो भाविकांना त्रास सहन करावा लागतो. शेगाव हे विदर्भातील व मध्य भारतातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आहे. येथे गरीब व श्रीमंतांना रांगेत लागूनच दर्शन घ्यावे लागते. विशेष रेल्वे असल्यास भाविकांना प्रवास करण्यास सुलभ होईल अशी माहिती पटेल यांना यावेळी देण्यात आली.  
रेल्वे मंत्री मल्लिकार्जून खडके यांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्यासमोर ठेवून श्री संत गजानन महाराज इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पटेल यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष भूषण दडवे, आमदार राजेंद्र जैन, रवींद्र दुरुगकर, विजय दहिकर, आनंदराव ठवरे, विलास हरडे, डॉ. सुधीर रणदिवे, सुधीर दुरुगकर यांचा समावेश होता. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार मुकुल वासनिक, खासदार विलास मुत्तेमवार, खासदार विजय दर्डा, भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनाही या मागणीचे निवेदन दिले असल्याचे भूषण दडवे यांनी म्हटले आहे.