नाशिकमार्गे ये-जा करणाऱ्या मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस आणि नंदिग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गैरसोय दूर करण्यासाठी तीन जादा डबे जोडण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
नाशिकहून मनमाडमार्गे सोलापूर व नांदेडसाठी सात तासात पोहोचणारी अतिजलद दैनंदिन पॅसेंजर, औरंगाबाद ते जोधपूरसाठी दैनंदिन सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाडय़ा सुरू कराव्यात, या गाडीचा मार्ग मनमाड, नाशिकरोड, कल्याण वसईरोड, अहमदाबाद मार्गे ठेवण्यात यावा, त्याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या मार्गाने मुंबई ते जम्मूतावीकरिता चोवीस तासात पोहोचणारी जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
परिसरातील पर्यटक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी ही गाडी सुरू होणे गरजेचे आहे. मनमाड मार्गे साप्ताहिक ये-जा करणारी हैदराबाद-अजमेर एक्स्प्रेस, बंगळूरू-अहमदाबाद एक्स्प्रेस आणि नाशिकमार्गे साप्ताहिक लोकमान्य टिलक मुंबई-हरिद्वार व हजरत निजामुद्दीन या महत्वाच्या दोन गाडय़ांना प्रवाशांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सदरच्या गाडय़ा दररोज सुरू करण्यात याव्यात. कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर पूर्व तयारीसाठी नाशिकरोड आणि मनमाड रेल्वे स्थानकाचा अत्याधुनिक पध्दतीने विस्तार करण्यात यावा, अशा सूचनाही बुरड यांनी केल्या आहेत. हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण या दोघा खासदारांनाही बुरड यांनी निवेदन दिले आहे.