सुटय़ा स्वरूपात मिळणाऱ्या खाद्य तेलामध्ये मोठय़ा प्रमाणात भेसळ होत असल्याचा आरोप ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ने (सीजीएसआय) केला आहे. संस्थेने केलेल्या पाहणीत सुटय़ा तेलाचे काही नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी ६४ टक्के तेलाच्या नमुन्यांमध्ये भेसळ झाल्याचे संस्थेला आढळून आले आहे.
बाजारात सुटय़ा स्वरूपात मिळणाऱ्या तेलाचा दर्जा तपासण्यासाठी सीजीएसआयने फेब्रुवारी, २०१४मध्ये २६९ नमुने जमा केले. तेलाचे हे नमुने मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये तपासण्याकरिता देण्यात आले. यात तीळ, नारळ, शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आदी तेलांचा समावेश होता. गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सुटय़ा तेलाचा वापर सर्वाधिक होतो. पण, या भेसळयुक्त तेलामुळे या कुटुंबाची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक होत आहे.
‘आम्ही गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये धोकादायक पदार्थ आढळून आले नाहीत. परंतु, बहुतेक तेलाच्या नमुन्यांमध्ये दर्जाहीन पामोलीनचा वापर करण्यात आला आहे,’ अशी माहिती सीजीएसआयचे सचिव एम. एस. कामत यांनी दिली. ‘मोठय़ा प्रमाणात तेल विकत घेणे न परवडणाऱ्या कुटुंबांच्या सोयीकरिता सुटे तेल विकण्याकरिता सरकारने २०१३मध्ये सुटय़ा तेलाच्या विक्रीला परवानगी दिली. परंतु, ग्राहकांच्या माथी भेसळयुक्त तेल मारले जात आहे. परिणामी हे आदेश मागे घेण्यात यावे,’ अशी मागणी कामत यांनी केली.
‘श्ॉम्पू, टूथपेस्ट यांप्रमाणे खाद्यतेलही छोटय़ा पाकिटात किंवा टेट्रा पाकिटात विकले तर काय हरकत आहे,’ असा सवाल सीजीएसआयचे अध्यक्ष सीताराम दीक्षित यांनी केला. ‘काही तेलाच्या नमुन्यांमध्ये तर आम्हाला ९० टक्के पामोलीन आढळून आले. यावरून या प्रश्नाची तीव्रता लक्षात यावी,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सुटय़ा तेलाच्या विक्रीवर सरकारने बंदी घालवी याकरिता आपण पाठपुरावा करण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संबंधीचा आदेश ऑक्टोबर, २०१४मध्ये संपुष्टात येणार आहे. किमान त्यानंतर तरी त्याला पुनस्र्थापित करू नये, अशी मागणी त्यांनी केली.