खासगी आरामदायी बसच्या टपावरून किंवा डिकीमधून होणारी मालवाहतूक त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी नाशिक वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन विभागाकडे केली आहे. मागील दोन महिन्यांपासून संघटनेच्या वतीने या मागणीचे निवेदन वारंवार देण्यात येत असूनही परिवहन विभागाच्या वतीने कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष अंजू सिंघल यांनी नाराजी व्यक्त केली.
परिवहन विभागाकडून याप्रश्नी त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. परिवहन कार्यालयात दलालाशिवाय काही काम होत नाही. या कार्यालयात ८० टक्के काम दलाल करतात. कारकून कोण आहे तेच समजत नाही. त्यामुळे भेटणार कोणाला, असा प्रश्नही सिंघल यांनी उपस्थित केला.  लोकप्रतिनिधींनीही परिवहन विभागातील कामकाजाची दखल घ्यावी, अशी मागणी सिंघल यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अवतार सिंग बिरदी, सुभाष झांगडा, किसन बेनिवाल, अनिल कौशिक, रतन अग्रवाल आदी उपस्थित होते.