लोकप्रतिनिधींना एखाद्या प्रकरणात माहिती देण्यास टाळाटाळ करणारे अभियंते सामान्यांचे प्रश्न कसे सोडवतील, असा सवाल करीत अशा निष्क्रिय अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पनवेलच्या नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी पनवेल नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. या अगोदर नगर परिषदेतील सर्वसाधारण सभेत चुकीची माहिती दिल्यामुळे सदस्यांनी सदर कनिष्ठ अभियंता राजेश कर्डिले यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. कर्डिले यांच्याकडे नगर परिषदेमधील वृक्ष प्राधिकरण विभागाची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींनी माहिती मागूनही आज देतो, उद्या या, परवा सुट्टी आहे अशी कारणे देऊन वेळकाढूपणा करणाऱ्या कर्डिले यांचे वर्तन चुकीचे असल्याचे मोहोकरांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यापासून झाडांची कत्तल झाली त्यानंतर सबळ पुरावे देऊनही नगर परिषदेकडून कारवाई झाली नाही, मात्र जेथे वृक्षांची कत्तल झाली त्या जागेवरील बांधकाम निर्धास्त सुरू आहे असेही मोहोकर यांचे म्हणणे आहे. नगर परिषदेने कोणतीही दखल न घेतल्याने मोहोकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही नगर परिषदेतील अधिकारी गंभीरपणे हे प्रकरण घेत नसल्याचे मोहोकर यांचे म्हणणे आहे. याबाबत पनवेल नगर परिषदेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांनी अभियंता कर्डिले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लवकरच याविषयी कायदेशीर पारदर्शक कारवाई करू असेही पंडित म्हणाल्या.