आंध्रातून मनमाड-शिर्डी व इतर लांब पल्ल्याच्या जलद रेल्वेगाडय़ा मराठवाडय़ातून जातात. परंतु त्यांचा मराठवाडय़ाच्या जनतेसाठी काहीही लाभ नाही. या सर्व गाडय़ांमध्ये मराठवाडय़ातील जनतेसाठी विशेष आरक्षण कोटा द्यावा, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने केली आहे. या संदर्भात विभागीय प्रबंधकांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.
आंध्र प्रदेशमधून मनमाड व शिर्डीकडे, तसेच इतर लांब पल्ल्याच्या गाडय़ा अिजठा एक्सप्रेस, काकीनाडी-शिर्डी, विजयवाडा-शिर्डी, सिकंदराबाद-शिर्डी, नरसापूर-नगरसोल, रामेश्वरम-ओखा दररोज ये-जा करतात. या गाडय़ांची संख्या डझनाहून अधिक आहे. या सर्व जलद गाडय़ा आहेत. या गाडय़ांमध्ये मराठवाडय़ातील जनतेला कधीच आरक्षण मिळत नाही. आरक्षण तिकीट काढले, तरीही ते कधीही कन्फर्म होत नाही. या गाडय़ा आंध्रातून प्रवाशांची पूर्ण गर्दी भरून येतात. या गाडय़ांमध्ये उभे राहण्यासही जागा नसते. त्यातच आंध्रातील प्रवासी दादागिरीने सामान्य अनारक्षित बोगीतील दरवाजेही उघडत नाहीत. त्यामुळे या गाडय़ा मराठवाडय़ातून धावतात खऱ्या, परंतु त्याचा काडीचाही उपयोग मराठवाडय़ातील जनतेला होत नाही. देवगिरी एक्सप्रेसला नांदेड व औरंगाबाद भागासाठी विशेष कोटा दिला आहे, त्या धर्तीवर वरील गाडय़ांनाही विशेष कोटा द्यावा. अन्यथा या पुढे या गाडय़ा या भागातून जाऊ द्यायच्या की नाही? याचा विचार करावा लागेल, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, नितीन धूत, रमाकांत कुलकर्णी, अरूण अडागळे, शिविलग बोधने आदींच्या या निवेदनावर सह्य़ा आहेत.